शेतकरी आंदोलनाचा द्राक्ष हंगामाला फटका; दरात येईना गोडवा

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : थंडीसह प्रतिकुल वातावरण, केंद्र शासनाने अनुदानावर मारलेली फुली व कंटनेर दरात भाडेवाढ अशी संकटाची मालिका सुरू असतांना दिल्लीतील शेतकरी आंदोलन द्राक्ष उत्पादकांच्या मुळावर उठले आहे. आंदोलनामुळे दिल्लीच्या सिमा बंद असल्याने द्राक्षमालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश मिळत नाही. दररोज २२ टनाच्या ४० ट्रक इतर राज्यात पाठव्याव्या लागत असल्याने दर खाली आल्याने गोडवा आलेला नाही. 

..द्राक्षाला उठाव नाही

द्राक्ष हंगामाची सुरवातच यंदा संकटापासून झाली आहे. नैसर्गिक व केंद्र शासनाच्या धोरणांनी द्राक्ष उत्पादक मेटाकुटीस आले आहे. त्यात भर पडली ती दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची. नाशिक व सांगली जिल्ह्यात द्राक्ष हंगामाला वेग आला असतांना दिल्लीत दररोजच्या ८० ट्रक पोहचू शकत नाही. उत्तर प्रदेश, हरियाणा, गाझीयाबाद, नोएडा या सिमांवर शेतकऱ्यांचे जथ्थे आहे. फक्त यमुना बायपासने दिल्लीत प्रवेश मिळतो आहे. त्यामुळे ८० ऐवजी दिवसभरात अवघ्या ४० ट्रक दिल्लीत पोहचत आहे. आंदोलनामुळे दिल्लीत जनजीवन विस्कळीत असल्याने द्राक्षाला उठाव नाही. तेथील आझादपूर, गाझीयाबाद, गुडगाव, ओकला या बाजारपेठेत द्राक्ष पोहचूनही किरकोळ विक्रेते खरेदीसाठी येत नाही. त्यामुळे सुमारे एक हजार टन द्राक्ष इतर राज्यात पाठवावे लागत आहे. तेथे मागणीपेक्षा अधिक पुरवठा होत असल्याने दरात अद्याप उसळी आलेली नाही. अवघे ३० ते ३५ रूपये थॉमसन तर ५० ते ७० रूपये काळी, सोनाकाचे दर आहेत. 

हेही वाचा- रस्त्यावर फेकलेली 'नकोशी' झाली 'हवीशी'! नुकत्याच जन्मलेल्या शकुंतलाला मिळाले आई-बाबा

नाशिक जिल्ह्यात द्राक्ष हंगामाने वेग पकडला आहे. उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, राज्यस्थान, पश्‍चिम बंगाल, बांग्लादेश येथे दररोज १०० ट्रकमधून दोन हजार टन द्राक्ष पोहचत आहे. थंडीचा वाढलेला मुक्काम द्राक्ष हंगामाला मोठा अडसर ठरतो आहे. 

डिझेल दरवाढीने वाहतूक खर्चात वाढ... 

नाशिक जिल्ह्यातून २० टनाची द्राक्षाची वाहतूक करणाऱ्या ट्रकला उत्तर प्रदेश, बिहार, सिल्लीगुडी आदी ठिकाणी गेल्यावर्षी सुमारे एक लाख रूपये भाडे खर्च यायचा. गेल्यावर्षी ६८ रूपये डिझेलचे दर आता ८२ रूपये प्रतीलिटरवर पोहचले आहे. त्याचा परिणाम ट्रक मालकांनी गाडी भाड्यात २० हजार रूपयांपर्यत वाढ केली आहे. या दरवाढीने व्यापाऱ्यांनी कमी दराने द्राक्षांचे सौदे केले असून, शेतकऱ्यांवरच त्याचा भार पडला आहे. 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

दिल्लीत शेतकरी आंदोलनामुळे द्राक्ष ट्रक पोहचू शकत नाही. ते ट्रक इतर ठिकाणी वळवावे लागत आहे. डिझेल दरवाढीमुळे भाडेवाढ झाली आहे. या सर्वांचा परिणाम द्राक्ष दरावर झाला आहे. 
- सुरजीत भिल्ला, भोले ट्रान्सपोर्ट, पिंपळगाव बसवंत