शेतकरी पुन्हा एकदा अस्मानी संकटात! इगतपुरीसह त्र्यंबकेश्वरला अवकाळी, गारांचा तडाखा 

इगतपुरी/त्र्यंबकेश्‍वर (जि. नाशिक) : गेल्या दोन दिवसात हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्या अंदाजानुसार आज (ता.१८) संध्याकाळी साडे पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास अर्धा ते पाऊण तास पाऊस झाला. या पावसामुळे गहू, कांदा, हरभरा व पालेभाजी पिकांचे नुकसान झाले असून, शेतकरी पुन्हा एकदा संकटात अस्मानी सापडला आहे.

तालुक्यातील पूर्व व पाश्चिम भागातील वाडीवऱ्हे, सांजेगाव, गोंदे दुमाला मुकणे, पाडळी देशमुख, साकूर, शेणीत, कवडदरा, धामणगाव, घोटी खुर्द, त्रिंगलवाडी, बलायदुरी, भावली, मानवेढे, अस्वली स्टेशन, नांदगाव बुद्रुक, नांदुरवैद्य येथे शेती मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणचा शेतकरी वर्ग हा शेतीवर अवलंबून आहे. 

हेही वाचा - नियतीने पुन्हा तिचे बाळ 'तिच्या' झोळीत टाकले! मातेचे कोरडे पडलेले डोळे पुन्हा पाणावले

 

शेतकऱ्यांची धाकधूक वाढली

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मुबलक प्रमाणात पाणी असल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा, गहू, हरभरा, मसुर तसेच पालेभाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. मागील पंधरा दिवसापूर्वी अंगात हुडहुडी भरणारी थंडी जाणवत होती. त्या थंडीमुळे गहू व कांदा पीक मोठ्या जोमाने आले होते. मात्र, मागील दोन दिवसापासून पुन्हा एकदा थंडी गायब झाली. हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्या अंदाजा नुसार आज झालेल्या पावसामुळे काढणीस गहू, हरभरा, कांदा व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान ऑक्टोंबर, नोंव्हेंबर महिन्यातील सुरवातीलाच अतिपावसामुळे तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे हतबल झाला होता. त्यातच कांदा व इतर पिकावर महागडी औषधे फवारणी करून कसेबसे कांदा पीक टिकवले होते. तर, काही ठिकाणी गव्हाचे पीक आता कुठे डोके वर काढीत होते तर काही ठिकाणी गहू हा ओंबिबर आला आहे. गहू या पिकाला सर्वाधिक धोका हा गारपिटीचा असल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. 

हेही  वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय

अवकाळीमुळे गव्हाच्या ओंबीवर व इतर पालेभाज्या व फळभाज्यांवर पाणी साचल्यामुळे पिकांवर परिणाम होण्याची शक्यता असून, गहूसारखे पिक काळे पड्ड शकते. काढणीस आलेला गहू पूर्ण जमिनदोस्त होईल. 
- शांताराम गोवर्धने, शेतकरी