शेतकरी सहकारी संघाच्या अध्यक्षांना घरचा आहेर; मका खरेदीत गैरव्यवहाराचा आरोप

मालेगाव (नाशिक) : शेतकरी सहकारी संघाच्या एकाधिकार मका खरेदी केंद्रावर संघाचे अध्यक्ष हे व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांच्या मदतीने गैरव्यवहार करत आहे. मका खरेदीसाठी, मका मोजणी तसेच हमालीच्या नावाने प्रती वाहन तीन ते चार हजार रुपये वसुली सुरु असल्याचा आरोप शेतकरी सहकारी संघाचे संचालक भूषण गोलाईत यांनी निवेदनाद्वारे केला आहे.

निवेदनात म्हटले आहे...

गोलाईत यांनी संचालक मंडळाचे सर्वेसर्वा युवानेते अद्वय हिरे यांना या गैरव्यवहारासंदर्भात निवेदन सादर करीत गैरव्यवहाराची चौकशी करुन निर्णय घेण्याची मागणी केली आहे. शेतकरी संघात हिरे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ आहे. संचालक मंडळात कोणीही विरोधक नाही. विठोबा छरंग हे संघाचे अध्यक्ष असून संचालकांनी त्यांच्यावर थेट आरोप केल्याने अध्यक्षांना मिळालेल्या या घरच्या आहेरची चर्चा सुरु आहे. गोलाईत यांच्या निवेदनाचा आशय असा - हिरे यांनी मोठ्या परिश्रमाने संस्थेला शासनाचे एकाधिकार मका खरेदी केंद्र मिळवून दिले.

संचालक मंडळाची बदनामी थांबवण्याची मागणी

संघाचे व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी मका, तूर, हरभरा करताना शेतकऱ्यांच्या वाहनांना बगल देत व्यापाऱ्यांनी दिलेला सातबारा उताऱ्याचा माल रात्री-अपरात्री मोजून घेतला. त्यापोटी तीन ते पाच हजार रुपये वसुली करण्यात आली. शेतकऱ्यांकडूनही पैशांची मागणी झाली. पैसे न दिल्यास माल खराब किंवा कमी आद्रतेचा दाखवून वाहन परत पाठवतात. हमाली 25 ते 50 रुपये क्विंटल रोख मागणी करुन वसुली होते. व्यवस्थापकांना जाब विचारला असता त्यांनी थेट अध्यक्षांनी सांगितल्यावरुन व रोख पैसे द्यावे लागत असल्याचे सांगितले. तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष मोरे, लहु पवार, भाऊसाहेब गुंजाळ आदी शेतकऱ्यांनी पैसे न दिल्याने त्यांचे ट्रॅक्टर परत गेले. या सर्व गैरव्यहाराची चौकशी करावी. संचालक मंडळाची बदनामी थांबवावी अशी मागणी गोलाईत यांनी केली.

संचालकालाच झटका

संघाचे संचालक भुषण गोलाईत हे स्वत: मका मोजण्यासाठी गेले असता तीन दिवस त्यांचे वाहन नंबरसाठी उभे होते. त्यांनी स्वत: भेट दिली असता पैसे घेण्याचे काम राजरोसपणे चालू होते. त्यांच्याकडूनही हमाली म्हणून चार हजार रुपये रोख स्वरुपात घेण्यात आले. तसेच प्रति ट्रॅक्टर तीन हजार रुपये प्रमाणे मागणी करण्यात येत होती. अध्यक्ष व कर्मचारी सर्रासपणे हा प्रकार करत होते.

संचालक भुषण गोलाईत यांचे आरोप धांदात खोटे व राजकीय द्वेषातून आहेत. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांचे हे काम सुरु आहे. अध्यक्षपदाची संधी न मिळाल्यानेही त्यांनी हे आरोप केलेले असू शकतात. मका खरेदी गैरव्यवहाराशी आपला संबंध नाही. अधिकारी, कर्मचारी दाेषी असतील तर चौकशी करुन कारवाई करु. - विठोबा छरंग अध्यक्ष, शेतकरी सहकारी संघ.