शेतकऱ्यांचा लाँग मार्च घाटनदेवीतून राजधानीकडे; ऐतिहासिक मार्चमुळे महामार्गावर वाहतुकीत बदल 

घोटी (जि. नाशिक) : मुंबई-नाशिक महामार्गावरून अखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा रविवारी (ता.२४) सकाळी साडेआठला जुन्या कसारा घाटातून मुंबईच्या दिशेने निघाला. शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक लाँग मार्चमुळे महामार्ग ठप्प झाला आहे. तसेच महामार्ग पोलिस घोटी केंद्रातर्फे प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

जुन्या घाटातील वाहतूक नवीन कसारा घाटातून वळविली आहे. पायीच निघालेला हा लाँग मार्च दुपारी साडेबारला लतीफवाडी, कसारा येथे पोचून मुंबईकडे रवाना झाला. या लाँग मार्चमध्ये साडेचार हजारांहून अधिकचा जनसमुदाय सहभागी झाला असून, बंदोबस्तासाठी महामार्ग पोलिस केंद्र घोटीचे दोन अधिकारी, २३ अंमलदार, २५ पोलिस व स्थानिक पोलीस ठाणे/नाशिक ग्रामीण/ठाणे ग्रामीणकडील सुमारे दहा अधिकारी, १०० पोलिस उपस्थित होते. कार्यकर्त्यांना जुन्या कसारा घाटातून पायी जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था नवीन कसारा घाटातून केली होती. 

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच

महामार्गही थांबला 

शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक लाँग मार्चसाठी कायम धावणारा हा महामार्ग काही काळ थांबला होता. अवजड वाहनांना ‘गोल्डन हॉवर’ राबवून काही काळ थांबवून दोन्ही घाटात पॉइंट नेमून अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करत लाँग मार्च यशस्वीपणे जिल्ह्यातून पार करून देत वाहतूक व्यवस्था चोख ठेवण्यात आली. परिस्थितीवर जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, विभागीय पोलिस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर पाटील, महामार्ग घोटी केंद्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, घोटीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या