शेतकऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा; अवकाळीने देवळ्यात कांदापीक संकटात

देवळा (नाशिक) : तालुक्याच्या काही भागात पावसाळी वातावरणासह पावसाच्या सरी पडल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण आहे. यापूर्वी अतिवृष्टीमुळे कांद्याचे रोप व खरीप कांदे यांच्यावर बुरशीजन्य रोग आल्याने मोठे नुकसान झाले आहे. आता उन्हाळ कांदा लागवड करत त्याचे उत्पादन घेण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील असताना अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे. 

कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव

देवळा तालुक्यात वाखारी, लोहोणेर, सावकी व इतर परिसरात पावसाच्या सरी पडल्या. शनिवार (ता. ९) दिवसभर ढगाळ वातावरणमुळे पावसाची शक्यता असल्याने शेतकरी धास्तावला आहे. आता टाकलेले कांदापीक खराब झाले, तर उन्हाळ कांद्याची पुन्हा लागवड करणे अशक्य होईल. त्यामुळे काही करून कांद्याचे पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांची जीवतोड मेहनत सुरू आहे. वेळोवेळी फवारण्या केल्या जात आहेत. अशीच गत लाल कांदा पिकाची आहे. लेट खरीप कांदा पिकावा अन् चार पैसे मिळावेत, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. परंतु अशा वातावरणामुळे व पावसामुळे कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. 

हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार

अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना या आस्मानी संकटाला सामोरे जावे लागत आहे. - किरण आहेर, युवा शेतकरी, देवळा  

हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप