शेतकऱ्यांना विश्‍वास देण्यासाठी पंतप्रधानांची ‘पुस्तक डिप्लोमसी’; देशभरातील जिल्हा परिषद अध्यक्षांना पुस्तक भेट 

नाशिक : देशात मागील काही महिन्यांपासून कृषी कायद्यांवरून दिल्लीत शीख समुदायातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचे रान उठविले असताना नाराज शेतकऱ्यांमध्ये विश्‍वास निर्माण करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने आता पुस्तक भेटीतून शेतकऱ्यांशी नाते जोडण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. शेतकरी व शीख समुदायाप्रति पुस्तकाच्या माध्यमातून स्नेह दाखविण्याचा हा प्रयत्न आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांना प्रत्येकी दोन पुस्तके पाठविली जात असून, त्याद्वारे शेतकरी कायद्याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न आहे. यातील एक पुस्तक ‘अन्नदात्याच्या कल्याणासाठी समर्पित मोदी सरकार’, तर दुसरे पुस्तक ‘पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारचे शीख समुदायाशी असलेले विशेष नाते’ हे आहे. 

पहिल्या पुस्तकात मोदी सरकारच्या कृषी सुधारणेबाबतचे सत्य मांडण्यात आले असून, यात कृषी कायद्यांमुळे किमान आधारभूत किंमत व्यवस्था कायम राहणार, बाजार समितीचे कामकाज सुरू राहणार असल्याचा संदेश दिला आहे. दुसऱ्या पुस्तकामध्ये दरबार साहिबसाठी एफसीआरए नोंदणी, करमुक्त लंगर, कर्तारपूर साहिब मार्गिका, शीख युवकांना सुदृढ करणे, पंजाबच्या विकासाला गती, संकटकाळी मदतीचा हात, पाकिस्तानमधील शिखांसोबत समन्वय यासह अन्य माहिती आहे.  

हेही वाचा - लग्नबेडीपुर्वीच हाती पडल्या पोलिसांच्या बेड्या! नवरदेवाचे ते स्वप्न अपुरेच..

जि.प. अध्यक्ष किती? 

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व त्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा म्हणून मोदी सरकारने कृषी कायद्यांमध्ये बदल करत तीन नवे कायदे तयार केले. मात्र, या कायद्यांना शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला. शासनाने हे कृषी विधेयक कायदे रद्द करावेत यासाठी दिल्लीत अडीच ते तीन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. त्याचे पडसाद देशभरात शेतकऱ्यांमध्ये उमटत आहेत. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने पंतप्रधानांच्या पुस्तकाचा फॉर्म्युला केला असला, तरी खरा प्रश्‍न हाच आहे, की राज्यात सद्यःस्थितीत महाविकास आघाडीचे सरकार आहे. ग्रामीण भागात राष्ट्रवादी व शिवसेना हे मोठे पक्ष आहेत. त्यामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत भाजपचे जिल्हा परिषद अध्यक्ष किती आहेत? तसेच पंतप्रधानांच्या पुस्तकातील विचार बिगर भाजप जि.प. अध्यक्षांना कितपत मानवणार, हादेखील प्रश्‍नच आहे. म्हणूनही हे पुस्तक चर्चेचा विषय बनले आहे. 

 हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना