शेतकऱ्यांवर अस्मानीसह सुलतानी संकट; काहींची कृषी विभागात धाव तर काहींनी थेट पोलिस ठाणेच गाठले

अंबासन (जि.नाशिक) : शेतकऱ्यांसाठी सध्या शेती आतबट्ट्याचा व्यवसाय झाली आहे. शेतातील मेहनतीत जगवलेली पिके तोट्यात जाऊ लागली आहेत. तालुक्यातील बहुतांश तरुणाई शेतात पिकातून दोन पैसे येतील, या भरवशावर रात्रंदिवस काबाडकष्ट करतात. मात्र बोगस बियाणे युवा शेतकऱ्यांपुढे आव्हान ठरत आहे.

काहींची कृषी विभागात धाव तर काहींनी थेट पोलिस ठाणेच गाठले

एकीकडे वातावरणातील बदलाच्या समस्येवर तोंड देत शेतकरी शेतात राबतात. दुसरीकडे बोगस बियाण्यांमुळे कांद्याला डोंगळे फुटल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी कृषी विभागात धाव घेतली, तर काहींनी थेट पोलिस ठाणेच गाठले आहे. 

कृषी विभागाकडेही बहुतांश शेतकऱ्यांच्या तक्रारी

काबाडकष्ट करून शेतात पिके उभी करायची आणि निकृष्ट बियाणे असल्याचे निदर्शनास येताच संपूर्ण केलेले पिकांवर फवारणीसह काबाडकष्ट वाया जातत. त्या मुळे युवा शेतकरी पुरता हतबल होत आहे. बियाणे विक्रेत्यांकडून मात्र टोलवाटोलवी केली जात असल्याचा आरोप तक्रारदार करीत आहेत. तालुक्यातील सटाणा पोलिस ठाण्यात व जायखेडा ठाण्यात बोगस बियाण्यांबाबत तक्रार नोंदविण्यात आली आहे. कृषी विभागाकडेही बहुतांश शेतकरी तक्रारी करीत असल्याचे तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी सांगितले. यात टोमॅटो, कोबी, कोथिंबीर, मका, बाजरी, कांदा आदी पिकांची बोगस बियाण्यांबाबत तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. काही शेतकऱ्यांना संबंधित कंपनीकडून भरपाई मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. संबंधित कंपनी कुठलीही दखल घेत नसल्याने त्या कंपनीला पंचायत समितीकडून नोटीस बजावण्यात आल्याचे पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून सांगण्यात आले. 

हेही वाचा - रूम नंबर १०५ चे गुढ कायम; मुंबई-नाशिक हायवेवरील हॉटेलमधील घटना

कसा होतो पंचनामा 
तक्रारी अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित दुकानाची तपासणी केली जाते. त्याचबरोबर शेतकरी तक्रार अनुषंगाने संबंधित कांदा बियाण्याचा लॉट क्रमांक व इतर समांतर प्लॉटची पाहणी केली जाते. त्याचबरोबर तक्रारग्रस्त प्लॉटचीही पाहणी केली जाते. पंचनामा करताना तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती पाहणी करते व पंचनामा केला जातो. या समितीत तालुका कृषी अधिकारी अध्यक्ष असतात. कृषी विज्ञान केंद्र किंवा संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ, पंचायत समितीचे कृषी अधिकारी असतात. संबंधित कंपनी व दुकानदारांना पंचानामाची वेळ कळवून त्यांनाही उपस्थित बंधनकारक असते व पंचनामा केला जातो, असे बागलाण पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रणय हिरे यांनी सांगितले. 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

कांदा बियाणे मिळत नव्हते; आम्ही मनमाड येथील एका बियाणे दुकानातून खरेदी केले. बियाणे निकृष्ट निघाले. आम्ही संपर्क केला. मात्र उडवाउडवीची उत्तर देत आहेत. शासनाने बोगस बियाण्यांबाबत कठोर पाऊल उचलावे. 
-योगेश कोर, युवा शेतकरी अंबासन 

तालुकास्तरीय पीक तक्रार निवारण समिती अहवाल 

पीक शेतकरीसंख्या कंपन्यांकडून भरपाई ग्राहकमंचातील अहवाल 
टोमॅटो २२ ०० २२ 
कोबी २६ ११ १५ 
कारले ०१ ०१ ०० 
कोथिंबीर ०१ ०१ ०० 
मका १६ ०० १६ 
बाजरी ०५ ०० शेतकऱ्यांनी तक्रारी अर्ज मागे घेतले 
कांदा १५ ०० १५ अजूनही तक्रारी येण्याची शक्यता 
एकूण ८६ १३ ८६ अजून तक्रारी वाढण्याची शक्यता