शेतकऱ्याचा माळरानावर अभिनव प्रयोग! ५० एकारांत फुलविली चिकू अन् द्राक्षांची बाग 

दिंडोरी (नाशिक)  : तालुक्यातील खेडगाव येथील सुरेश डोखळे यांनी दहा वर्षांपासून द्राक्षबागेतच पन्नास एकर माळरानावर चिकूची लागवड केली आहे. चिकूच्या बागेत आंतरपीक घेतले जाते. त्यात बहुतेक जण पेरू, अॅपल बोर यांसारखी फळझाडी लावतात. परंतु सुरेश डोखळे यांनी चक्क द्राक्षबाग जुनी होत असताना त्यात चिकूची बाग लावली आहे. काही वर्षांपासून ती यशस्वीपणे सुरू आहे.

चिकू, द्राक्षांसोबत चिंचेचेही उत्पन्न

मुरूम असलेल्या माळरानावर फार फार तर गायी चरतात. तब्बल पन्नास एकरांच्या आसपास असणाऱ्या या माळरानावरील जागाही खाली-वर आहे. काही ठिकाणी खूपच खोल होती. अशा ठिकाणी थोडेफार सपाटीकरण करून व्यवस्थित केली गेली. चिकूच्या झाडाची वाढ, त्याला लागणारी जागा, याचा विचार करून योग्य त्या अंतरावर चिकू व द्राक्षांची झाडे लावली आहेत. अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या वडनेरभैरव रस्त्यालगत असणाऱ्या शेतातही अंदाजे वीस एकरांवर हाच प्रयोग यशस्वी केला आहे. माळरानावरील द्राक्षबागेची मर्यादा संपुष्टात आली होती म्हणून वीस-पंचवीस एकर बाग काढून टाकली. त्यात केवळ चिकूची झाडे आहेत. त्याचप्रमाणे दोन्हीही मळ्यात सहाशे ते सातशे चिंचेची झाडे बहरली आहेत. माळरानावर चहूबाजूंनी चिंचेची झाडे आहेत. आतमधील रस्त्याच्या दुतर्फा चिंच लावली आहे. चिंचेचेही उत्पन्न मिळते. 

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायर

चिकूचे प्रकार 

चिकूमध्ये दोन प्रकार असतात. एक काली पत्ती. त्याचे फळ अंडाकृती असते. खायलाही गोड आहे. दुसरे गोल व मोठ्या आकारात म्हणजे क्रिकेट बॉलसारखे. हे तुलनेने कमी गोड आहे. व्यापारी याला पसंती देतात. कारण हे मंडईमध्ये अधिक काळ टिकते. चिकूच्या झाडांची वयोमर्यादा अंदाजे सत्तर ते शंभर वर्षांपर्यंत असते. चिकूची लागवड केल्यानंतर किमान चार वर्षांनी फळ लागते. प्रारंभी एका झाडाला पाचशे चिकू येतात. खऱ्या अर्थाने याचे उत्पन्न दहा वर्षांनंतर सुरू होते. एका झाडाला दोन हजार फळ येतात. त्या वेळी खऱ्या अर्थाने उत्पन्न वाढते आणि म्हणून यात आतंरपीक घेतात.

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच