शेतमजूराचा विहीरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न; शेतमालकामुळे वाचले प्राण

नाशिक : पाथर्डी-गौळाणे रस्त्यावरील यशवंतनगरमधील कोंबडे मळ्यातील घटना. पाण्याने तुडुंब भरलेल्या विहीरीत काहीतरी पडल्याच्या आवाज झाला. शेतमालकासह आजूबाजूचे शेतकरीदेखील धावतच विहीरीकडे आले. विहीरीत डोकावून बघताच बसला धक्का. असे काय होते विहीरीत जाण्याने सगळ्यांचा थरकाप उडाला. वाचा नेमके काय घडले?

भरदुपारी घडली घटना

पाण्याने तुडुंब भरलेल्या गौळाणे रोडवरील कोंबडे मळ्यात सोमवारी (ता. ११) दुपारच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. शेतात काम सुरु असतांनाच एक शेतमजूर पाण्याने तुडुंब भरलेल्या विहीरीकडे गेला. सुनील सोना गांगुर्डे (वय ४२) असे त्या शेतमजूराचे नाव. या व्यक्तीने अचानकपणे विहिरीजवळ जाताच कठड्यावरून विहीरीत उडी घेतली. यावेळी पाण्याचा आवाज झाल्याने शेतीचे मालक त्र्यंबक कोंबडे यांच्यासह अन्य रहिवाशी शेतमजुरांनी विहिरीच्या दिशेने धाव घेतली. यावेळी गांगुर्डे हे पाण्यात पडलेले होते आणि विद्युत पंपाच्या पाइपचा आधार घेत, तरंगत असल्याचे दिसून आले. सगळा प्रकार बघताच सगळ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. 

 दोन दिवसापासून तब्येत बरी नव्हती..

स्थानिक शेतकरी आणि शिवसेनेचे विभागप्रमुख त्र्यंबक कोंबडे यांनी सांगितले की, गांगुर्डे पत्नी आणि चार मुलींसह तीन वर्षांपासून शेतीच्या कामासाठी त्यांच्याकडे होते. दोन दिवसांपासून त्यांची तब्येत बरी नव्हती. त्यामुळे ते दिवस-रात्र लहर आली की धावत सुटत होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. दुपारी अचानक त्यांनी जवळील सुमारे ६० फूट खोल आणि पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीमध्ये उडी घेतली आणि एकच गोंधळ उडाला.

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

अग्निशामक दल, पोलिसांच्या तत्परतेमुळे जीवदान 

गांगुर्डे यांनी उडी मारल्यानंतर पाण्याच्यया वरती आले आणि त्यांनी मोटरच्या पाईपचा आधार घेतला. दरम्यान, वरून त्यांना पाईप कोणत्याही परिस्थितीत सोडू नका असे सांगत होते. मात्र खाली उतरण्याची कुणाची हिंमत होत नव्हती. तातडीने इंदिरानगर पोलिस आणि अग्निशामक दलाला कळविण्यात आले. पोलीस कॉन्स्टेबल भाऊराव गवळी, कुशल राठोड, रवी राजपूत, मोहिते आणि अग्निशामक दलाचे बी. ए. चंद्रमोरे, एन. के. व्यवहारे, जयेश देशमुख, पी. जी. लहामगे, एस. बी. शिलावट आदी जवान तेथे पोचले. खाली मोठी शिडी सोडण्यात आली. रबरी ट्यूब सोडण्यात आला. मात्र, त्यात सुनील बसण्यास तयार नव्हते. त्यामुळे कॉन्स्टेबल गवळी यांनी कपडे काढले आणि ते विहिरीत उतरले आणि ट्यूबवर बसले. स्थानिक युवक प्रकाश जामदार शिडीवर उभे राहिले. दोघांनी सुनील यांच्या कमरेला दोर बांधला. वरती असलेले तुषार कोंबडे आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी त्यांना वरती खेचून घेतले. तत्काळ कार्यवाही झाल्याने त्यांचा जीव वाचवण्यात यश आल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. दरम्यान, पोलिसांनी घटनेची नोंद घेतली. सुनील यांच्या परिवारातील सदस्यांना ओझर येथून बोलावून घेण्यात आले असून, त्यांना त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.  

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा