शेतमालाचे वेळेत पैसे मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त; येवला, अंदरसूल बाजार समितीमधील प्रकार 

नगरसूल (जि.नाशिक) : येवला कृषी उत्पन्न बाजार समिती व अंदरसूल उपबाजार समितीत शेतमालाची विक्री केल्यानंतर पैसे वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त होत आहे. बाजार समितीच्या नियमानुसार प्रत्यक्ष शेतमाल विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना शेतमालाची रक्कम २४ तासांच्या आत रोख अदा करण्यात येईल, असा नियम असताना प्रत्यक्षात व्यापारी वर्गाकडून शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. 

शेतमालाचे पैसे वेळेत मिळावेत
किरकोळ स्वरूपात रक्कम देऊन शेतमालाच्या हिशेबपट्टी पावतीवर १५ ते २० दिवस पुढील तारीख टाकून शेतकऱ्यांना शेतमालाच्या विक्रीनंतर रिकाम्या हाताने पाठविले जात असल्याचा प्रकार व्यापाऱ्यांकडून होत आहे. दुसरीकडे बाजार समितीच्या कार्यालयाकडून मात्र रोजच्या शेतमालाच्या लिलावात पैसे रोख देण्यात येत असल्याचे ध्वनिक्षेपकाद्वारे सांगण्यात येते. प्रत्यक्षात उशिराने १५ ते २० दिवसांनंतरच अनेक व्यापारी शेतमालाचे पैसे देत आहेत. बी-बियाणे, खते, औषधे व मजुरी खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. त्यामुळे शेतमालाचे पैसे वेळेत मिळावेत, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. 

 

अंदरसूल व येवला बाजार समितीत शेतमालाच्या विक्रीनंतर १५ ते २० दिवसांनी उशिरा पैसे मिळतात. त्यामुळे उधार व उसनवारी करून शेत भांडवल खर्च करावा लागतो. बाजार समिती प्रशासनाने व्यापारी वर्गास शेतमालाच्या रोख चुकवतीसाठी सक्त सूचना कराव्यात. - प्रभाकर निकम, शेतकरी, नगरसूल