नाशिक : पुढारी वृत्तसेवा-अयोध्या येथे दि. २२ जानेवारी रोजी प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचे लाेकार्पण (Shri Ram Mandir Ayodhya) थाटामाटात होणार आहे. या सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या मंगलमय सोहळ्यासाठी नाशिककरांना आमंत्रण देण्यासाठी अयोध्या येथून अक्षता कलश दाखल झाला आहे. पंचवटीमधील रामकुंड येथे शनिवारी (दि. १६) सकाळी 7.30 वाजता या अक्षता कलशाची मिरवणूक काढण्यात येणार आहे.
प्रभू श्रीरामचंद्र यांच्या अयोध्या येथील मंदिर गर्भगृह सोहळ्याचे (Shri Ram Mandir Ayodhya) आमंत्रण देशभरातील जनतेला देण्यात येत आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीने त्यासाठी १०० अक्षता कलश तयार केले असून, ते देशभरात पाठविले आहेत. नाशिक नगरातही हा अक्षता कलश दाखल झाला आहे. रामकुंड ते काळाराम मंदिराचे पूर्व द्वार अशी या मंगल कलशाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. रामकुंड येथून मालेगाव स्टॅन्ड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक, नाथ चौक, शिवाजी चौक, गजानन चौक, नाग चौक, ढिकलेनगर मार्गाने आल्यावर काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथे मिरवणुकीचा समारोप होईल. या यात्रेत जास्तीत-जास्त संख्येने नाशिककरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री योगेश बहाळकर, जिल्हाध्यक्ष विराज लोमटे व विभागमंत्री अनिल चांदवडकर यांनी केले आहे.
कारसेवकांचा सहभाग
रामकुंड येथून काढण्यात येणाऱ्या अक्षता कलश मिरवणुकीमध्ये विविध साधू-संत, तीर्थ पुरोहित तसेच १९८९ ते १९९२ या कालावधीमध्ये ज्यांनी श्रीराम मंदिर निर्माण संघर्षासाठी कारसेवक म्हणून सहभाग घेतला, असे साडेतीनशे कारसेवक सहभागी होतील. याशिवाय स्वामी नारायण मंदिर, महर्षी गौतम गोदावरी मंदिर, इस्कॉन मंदिर, भारत सेवाश्रम संघ, गजानन महाराज भक्त परिवार, गोंदवलेकर महाराज भक्त परिवार, ढेकणे महाराज भक्त परिवार, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आदी राजकीय पक्षांसह गौडीय मठ धर्मसभा, हिंदू नागरिक व रामभक्त मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा :
- Pune News : नारायणगावात एटीएसने आठ बांगलादेशींना पकडले
- IND vs SA : सूर्याचा जाळ, कुलदीपचा धूर; दक्षिण आफ्रिकेचा चक्काचूर
- Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | शुक्रवार, १५ डिसेंबर २०२३
The post श्रीराममंदिर लोकार्पणाचे नाशिककरांना आमंत्रण, अयोध्यातून अक्षता कलश दाखल appeared first on पुढारी.