संचारबंदीत सोहळे, कार्यक्रमांवर बंदी पण जुगारअड्ड्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष? 

नाशिक : शहरात जुगारअड्ड्यांवर कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येऊन जुगाराचे डाव लावत आहेत. त्यांच्यावर कारवाई का नाही, जुगारअड्ड्यांवर कोरोना विषाणू येत नाही का, असे प्रश्‍न नागरिकांकडून केले जात आहेत. 

जुगारअड्ड्यांवर गर्दी; पोलिसांचे दुर्लक्ष 
शहरात संचारबंदी लावून कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईच्या सूचना दिल्या जात आहेत. विविध प्रकारचे सोहळे, कार्यक्रमांवर बंदी आहे. एवढे सर्व करत असताना पोलिसांनी जुगारअड्डे का सोडून दिले, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. जुगारअड्ड्यांसह मद्याच्या दुकानांमध्ये तर एका वेळी अनेक जण एकत्र येत गर्दी करतात. त्यांच्यात कुठल्या प्रकारचे सामाजिक अंतर नसते. त्यांच्याकडून मास्क किंवा सॅनिटायझरचा वापर केला जात नाही. बिनधास्त जुगार खेळत असतात. असे जुगारअड्डे मुख्यत्वे करून कोरोना हॉटस्पॉट ठरू शकतो. अशा प्रकारचे चित्र शहराच्या सर्वच भागात आहे.

 हेही वाचा - स्‍वयंपाकगृह ते थेट 'CA'! गिरणी व्‍यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी

लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी

पोलिस आयुक्तांनी संबंधित पोलिस ठाण्यांना जुगारअड्ड्यांवर कारवाई करत अड्डे बंद करण्यासाठी आदेशित करावे. त्यातूनदेखील कोरोना प्रादुर्भावावर नियंत्रण येणे शक्य होऊ शकते. पोलिस आयुक्त पांडे यांनी याकडे लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.  

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ