नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसैनिकांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली असून, या अस्वस्थेतूनच शिवसेनेकडून ठिकठिकाणी चाचपणी करून कार्यकर्त्यांचे मनोबल टिकवून ठेवण्याकरिता मेळावे घेतले जात आहेत. याच उद्देशाने शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत हे गुरुवार (दि. 7)पासून नाशिकला तीन दिवस तळ ठोकून असणार आहेत.
खासदार राऊत गुरुवारी (दि.7) रात्री उशिरा नाशिकला येतील. शुक्रवारी (दि. 8) शासकीय विश्रामगृह येथे दिवसभर पदाधिकारी व शिवसैनिकांच्या भेटी घेणार आहेत. शनिवारी (दि. 9) नाशिकमधील शिवसेनेचे शक्तिस्थळ असलेल्या नाशिकरोड येथे कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत.
नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. अर्थात, गेल्या काही वर्षांपासून याच बालेकिल्ल्यात मनसे आणि भाजपनेही सत्ता मिळवत शिवसेनेला विरोधी बाकावर बसविले. त्यामुळे गतवैभव परत मिळविण्याकरता शिवसेनेकडून अनेकानेक प्रयत्न केले जात असून, संघटनेची बांधणी नव्याने करण्याकरिता नियोजन केले जात आहे. तरीही शिवसेनेला गेल्या 10 वर्षांपासून मनपात सत्तेपासून दूर राहावे लागले आहे. नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकार्यांमध्ये नेहमीच अंतर्गत वाद आणि धुसफूस पाहायला मिळते. त्यामुळेच कदाचित शिवसेनेला सत्तेपासून दूर राहावे लागले असावे. जिल्हा संपर्कप्रमुख आणि उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख यांच्या सर्वात जवळ कोण, यावरून नेहमी कुरबुरी होतात आणि त्याचे प्रत्यंतर अनेकदा आले आहे. त्यात आता एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी शिवसेनेतून बंड करीत राज्याची सत्ताच हाती मिळविल्याने शिवसेनेतील अनेक पदाधिकारी व शिवसैनिक यांच्यातील अस्वस्थता लपून राहिलेली नाही.
अनेक पदाधिकार्यांची होतेय कोंडी
शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते असताना नाशिकमधून मनपा तसेच इतरही कामकाजानिमित्त अनेक पदाधिकार्यांचे शिंदेंकडे नेहमीच ये-जा असायची. त्यामुळे या पदाधिकार्यांमधील आणि त्यांच्याशी संबंधित शिवसैनिकांची फाटाफूट होऊ नये, यासाठीच राऊत यांचा दौरा आहे. शिंदे यांना मानणार्या सुमारे 15 ते 20 माजी नगरसेवकांची कोंडी झाली असून, आगामी काळात ते उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असतील की, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
हेही वाचा :
- सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ‘मिशन झिरो ड्रॉप आऊट’ अभियान सुरू
- जीवन प्राधिकरण अभियंत्यासह दोघांना अटक
- खर्चाचा ताळमेळ बसवायचा कसा? घरगुती गॅस महागल्याने सर्वसामान्यांना प्रश्न
The post संजय राऊतांचा आजपासून नाशिकमध्ये तीन दिवस तळ appeared first on पुढारी.