Site icon

संजय राऊतांवरुन सुधाकर बडगुजर अजय बोरस्तेंवर बरसले, म्हणाले…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

खासदार संजय राऊत यांनी नाशिक दौऱ्यामध्ये केलेले आरोप अजय बोरस्ते यांच्या फार जिव्हारी लागलेले दिसतात. बोरस्तेंच्या प्रवेशावेळी बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, चायनीज माल जास्त काळ पक्षात टिकणार नाही. डीएनए तपासला पाहिजे. त्याचा बोरस्तेंना फार राग आलेला असून, त्यांनी संजय राऊतांवर बेछूट बिनबुडाचे आरोप केल्याचे स्पष्टीकरण ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिले.

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे आणि शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांमध्ये राजकीय घमासान सुरू आहे. राऊत यांनी नाशिक दौऱ्यात शिंदे गटात गेलेल्यांवर जोरदार टीका केली होती. त्या टीकेला शिंदे गटाने प्रत्युत्तर दिले. त्यावर ठाकरे गटाचे बडगुजर यांनी बोरस्ते यांच्यावर आरोप केले आहेत.

ते म्हणाले, यापूर्वी पाच वर्षे विरोधी पक्षनेता असताना आपणच राऊतांचे बगलबच्चे होता. त्यांच्यासोबत बसणे उठणे नेहमी होते आणि आज ते मात्र आपल्याला वाईट दिसतात. पक्ष सोडताना कोणावर तरी टीका करावी लागते. त्या भावनेतून आपण राऊतांवर टीका करत आहात. नेते पैसे घेतात म्हणून आरोप केले गेले, पण आपण १० वर्षे पक्षात होता आणि मुख्य पदावर होता. आपण किती पैसे दिले-घेतले याचे स्पष्टीकरण द्यावे, असे आवाहन बडगुजर यांनी केले. नेत्यांनी पैसे घेतले असते तर आपण पाच वर्षे त्या पदावर राहू शकला नसता. कारण पैसे देणारे खूप असतात. निष्ठेने काम करणारे कमी असतात. चुकीचे आरोप नेत्यांवर करू नका, असे सांगत प्रत्येकाने आपल्या मर्यादित राहावे. तसेच निवडणुकीत किस में कितना दम है, घोडा मैदान फार लांब नाही, असा सूचक इशाराही बडगुजरांनी दिला आहे.

हेही वाचा :

The post संजय राऊतांवरुन सुधाकर बडगुजर अजय बोरस्तेंवर बरसले, म्हणाले... appeared first on पुढारी.

Exit mobile version