
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वक्तव्यावरून वारकरी संप्रदायाकडून नाराजी व्यक्त होत असताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी अंधारेंची बाजू घेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे राज्यपाल आणि भाजपच्या मंत्र्यांविषयी वारकरी संप्रदाय गप्प का असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्याचबरोबर शिवसेना नेहमीच साधू महंत आणि वारकरी संप्रदायासोबत असल्याचा दावाही खासदार राऊतांनी केला.
नाशिक येथे खासगी दौऱ्यानिमित्त आलेल्या राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधत भाजप आणि शिंदे गटावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. भाजपसोबत न जाणाऱ्यांच्या हिंदुत्वाविषयी प्रश्नचिन्ह भाजपकडून उपस्थित केले जात आहे. अंधारे यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी वारकरी संप्रदायाशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सुषमा अंधारे यांनी यापूर्वी शिवसेनेवर काय आरोप केले यापेक्षा आता त्यांनी शिवसेनेचे विचार स्विकारत आपली भूमिका बदलली असल्याने भाजपने जुने मुडदे उकरून काढण्यापेक्षा राज्यपाल तसेच इतर नेत्यांवर कारवाई करावी, असे आवाहन करत खासदार राऊत यांनी अंधारे यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला. साधूमहंतांबाबत आमची श्रध्दा आहे आणि ती कायम राहिल. अंधारे या महाराष्ट्रातील ढोंगीपणा उघड करत आहे.
दि. १७ डिसेंबर रोजी महामोर्चा निघेल आणि हा मोर्चा सर्वात मोठा असेल. लव्ह-जिहादविषयी विचारले असता अशा स्वरूपाचे प्रकार सर्वच धर्मांमध्ये सुरू आहेत. कोणत्या धर्माची महिला, मुली असो त्यांच्यावरील अत्याचार करणाऱ्याला दंड झालाच पाहिजे. महिलांवरील होणारे अत्याचार हे कोणत्याच धर्माला मान्य नसून, अत्याचाराच्या विरोधात उभे राहिले पाहिजे. महिलांची सुरक्षा वाऱ्यावर सोडून निर्भया सुरक्षेसाठी पोलिसांना दिलेली वाहने गद्दारांच्या सुरक्षिततेसाठी धावत असल्याची टीकाही राऊत यांनी केली. घटनाबाह्य असलेले शिंदे-फडणवीस सरकार निवडणुका घाबरत असल्यानेच निवडणुका पुढे ढकलल्या जात असल्याचे सांगत आमची निवडणुकांना सामोरे जाण्याची पूर्ण तयारी असल्याचे सांगितले.
हेही वाचा :
- कोल्हापूर : बाजार समिती निवडणूक १५ मार्चपर्यंत लांबणीवर; उच्च न्यायालयाचे आदेश
- सांगली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ३ जानेवारीला इस्लामपुरात
- मोठा दिलासा – Wholesale Price Index : घाऊक महागाईचा दर २१ महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर
The post संजय राऊत यांनी घेतली सुषमा अंधारेंची बाजू, वारकरी संप्रदायाला केला 'हा' सवाल appeared first on पुढारी.