संतापजनक! पैशांच्या वसुलीसाठी महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न; VIDEO सोशल मिडियावर व्हायरल

नांदगाव (जि. नाशिक) : एखादी महिला दुसऱ्या महिलेला मारहाण करणार असेल तर त्याची वेगवेगळी करणे असू शकतात. मात्र पैसे वसुलीसाठी चक्क साडी फाडत विवस्त्र करण्याचा प्रयत्न करीत असेल तर? असा प्रकार नांदगाव तालुक्यात घडला आहे. मारहाणीचा व्हिडिओ बिरसा क्रांती दलाचे कोकण विभागाचे प्रमुख सुशीलकुमार पावरा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाकडे पाठविला आहे.

चपलेने मारहाण

या व्हिडिओत मारहाण करणाऱ्या महिलेची ओळख पटली असून, ती मासेविक्री करणारी आहे. ज्या महिलेला व तिच्या पतीला मारहाण झाली, ते दोघेही तालुक्यातील पिंप्राळे येथील आहेत. दोघेही ऊसतोड कामगार असून मारहाण करणाऱ्या संगीता वाघने पैसे वसुलीसाठी दहशत निर्माण केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. ज्या महिलेला मारहाण होते आहे, महिलेचा पती ‘जाऊ दे ना अक्का, अशी विनवणी‘ करताना दिसत आहे. तर चपलेने मारहाण करीत विवस्त्र करण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ

व्हिडिओ थेट मुख्यमंत्र्यांकडे

पिंप्राळे गावातील आदिवासी वस्तीतील हा व्हिडिओ असून तो थेट मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आल्यानंतर चौकशीची चाके फिरली. या घटनेबाबत पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा नोंदविला असून, मारहाण करणाऱ्या महिलेला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू होती. मारहाण करणारी महिला मासेमारी करीत असली तरी ती साखर कारखान्यांना मजूर पुरविण्याचेही काम करते. तिने पिंटू सोनवणे या मावसभावाला एका कारखान्याच्या उसतोडीसाठी एक लाख साठ हजारांची उचल दिली होती. त्याच्या वसुलीसाठी मारहाण झाली, असे तिचे म्हणणे आहे.

हेही वाचा - भय इथले कधी संपणार? नाशिकमध्ये विवाहितेसह चिमुरडीवर अत्याचार; भयंकर प्रकार