संत्री विकायला आले आणि कारनामा करुन गेले; घटनेने पोलिसही चक्रावले

नाशिक : ८ नोव्हेंबर रोजी ते नाशिक फ्रुट मार्केट येथे संत्री विक्रीसाठी घेऊन आले होते. त्यानंतर ते दोन दिवस सिन्नरमध्ये मुक्कामी थांबले. संगमनेर नाका परिसरातील दुकानांची रेकी केली. अन् १० नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीचा फायदा घेत केले असे...

अशी आहे घटना

औरंगाबादहून नाशिकमधील फ्रुट मार्केटमध्ये संत्री विक्रीस आलेल्या चोरट्यांनी परत जाताना सिन्नरमधील बॅटरीचे दुकान व ट्रान्सपोर्ट कंपनीचे गोडाऊन फोडून स्पेअर पार्टस व बॅटर्‍या लंपास केल्या होत्या. टाकळी (ता.खुलताबाद, जि.औरंगाबाद) येथील शेख आजिम शेख बाहशहा (वय ४६), वाळुंजगाव (जि.औरंगाबाद) येथील वाजिद रफिक चौधरी (वय २५) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. संशयित आरोपींनी ८ नोव्हेंबर रोजी नाशिक फ्रुट मार्केट येथे संत्री विक्रीसाठी आणले होते. त्यानंतर ते दोन दिवस सिन्नरमध्ये मुक्कामी थांबले. संगमनेर नाका परिसरातील दुकानांची रेकी केली. १० नोव्हेंबर रोजी मध्यरात्री संशयित आरोपींनी बॅटरीचे दुकान व ट्रान्सपोर्ट कंपनीचे गोडाऊन फोडून स्पेअर पार्टस व बॅटर्‍या लंपास केल्या. एकूण सुमारे ९ लाख २६ हजार ५१५ रुपयांचा मुद्देमाल लंपास होता. पोलीस तपासात चोरीच्या बॅटर्‍या व स्पेअर पार्टस वाळुंजगाव (जि.औरंगाबाद) येथील वाजिद रफिक चौधरी याच्या साहिल एंटरप्रायजेस भंगार दुकानामध्ये विक्रीस ठेवल्याचे उघडकीस आले. त्यानुसार पोलिसांनी त्यास वाळुंजमधून अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून टाटा आयशर (एमएच २१-सीटी २६२१) जप्त केली.

हेही वाचा > ३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक?

चोरटे निघाले सराईत गुन्हेगार

संशयित आरोपी शेख आजिम व त्याचे साथीदार आंतरजिल्ह्यातील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर औरंगाबाद, जालना, बुलढाणा, पुणे, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांमध्ये घरफोडी, चोरीचे गुन्हे दाखल आहेत. शेख आजिमच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. त्यांच्याकडून आणखी घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

हेही वाचा > निफाडच्या नगरसेवकाला लाखोंचा गंडा! बाजूने निकाल लावून देण्याच्या बोलीवर उकळले २० लाख