Site icon

संत निवृत्तीनाथ यात्रोत्सव : ‘ज्ञानोबा तुकाराम’च्या जयघोषाने दुमदुमले त्र्यंबकेश्वर

नाशिक, त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा

संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या यात्रोत्सवासाठी त्र्यंबकेश्वर शहरात सोमवारी (दि.१६) १०० हून अधिक पायी दिंड्या दाखल झाल्या आहेत. सकाळपासून त्र्यंबकनगरी ‘ज्ञानोबा तुकाराम’च्या जयघोषाने दुमदुमून गेली. त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर येऊन तेथे अभंग म्हटल्यानंतर पाठीमागे दिसणाऱ्या ब्रह्मगिरीचे दर्शन घेत दिंडी मंदिर प्रांगणात पोहोचते. विणेकरी मंदिरात दर्शनाला जातात. वारकरी मंदिराच्या प्रांगणात फुगड्या घालतात, अभंग म्हणतात. तेथून पश्चिम दरवाजाने बाहेर पडतात. कुशावर्तावर भगव्या पताकांसोबत असलेल्या देवतांच्या पादुकांना स्नान घालतात. तेथून हरिनामाचा जयघोष करत कृष्ण मंदिरात दर्शन घेऊन थेट संत निवृत्तिनाथ महाराजांच्या मंदिरात पोहोचतात.

संत निवृत्तिनाथ मंदिर संस्थानचे अध्यक्ष नीलेश गाढवे, सचिव ॲड. सोमनाथ घोटेकर यांसह अन्य विश्वस्त आणि उपसमितीचे सदस्य दिंडीचालक आणि वारकरी यांचे स्वागत करत आहेत. श्रीफळ, गुळाचा प्रसाद, दिनदर्शिका आणि नाथांची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात येत आहे.

नाशिक त्र्यंबक मार्ग भगव्या पताका हाती घेऊन चालणाऱ्या वारकऱ्यांनी गजबजला आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत नव्याने सुरू झालेल्या पायी दिंड्या शहरात मुक्कामी पोहोचल्या आहेत. वर्षानुवर्षे येणाऱ्या बहुतांश दिंडया पाच-सहा किलोमीटर अंतराच्या परिसरात विसावल्या आहेत. मंगळवारची सकाळ उजाडताच त्यांचे त्र्यंबकच्या दिशेने मार्गक्रमण सुरू होईल. दुपारी 1 पर्यंत सर्व लहान-मोठ्या दिंड्या त्र्यंबकेश्वर मुक्कामी पोहोचलेल्या असतील.

वाहन पार्किंगसाठी पोलिसांचे आवाहन

त्र्यंबकेश्वर शहरात भाविकांची दाटी झाली आहे. त्यात भाविक प्रवासी वाहनांची भर पडल्याने रहदारीच्या समस्या निर्माण होत आहेत. यासाठी त्र्यंबक पोलिसांनी भाविक प्रवाशांना बस प्रवासाला प्राधान्य द्यावे व सरकारी प्रवासी सेवेचा जास्तीत जास्त उपयोग करावा, असे आवाहन केले आहे. स्वत:चे वाहन जे आणतील त्यांनी ‘पे अँड पार्क’ तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या पार्किंगचा वापर करावा.

संत निवृत्तिनाथ मंदिरात दर्शनासाठी आलेले वारकरी भाविक आणि पायी दिंडीने येणारी वारकरी यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. दिंडीचालकांचे स्वागत करत त्यांची नोंद ठेवण्यात येत आहे. यात्रोत्सवासाठी उपसमितीची रचना करण्यात आली आहे व त्यांचे सहकार्य घेतले जात आहे.

– ॲड. सोमनाथ घोटेकर, सचिव, संत निवृत्तिनाथ मंदिर संस्थान

अशी आहे पार्किंगची व्यवस्था

नाशिकच्या बाजूने येताना श्री चंद्रभगवान लॉन्स नवीन बसस्थानकाच्या बाजूला व त्याच्या विरुद्ध बाजूस गॅस गोडाऊनकडे वाहने पार्क करावीत.

आंबोलीकडून येणारी वाहने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूला असलेल्या पार्किंगमध्ये, तर स्वामी समर्थ केंद्राकडून येणारी वाहने कचरा डेपोजवळील पार्किंगमध्ये पार्क करावीत.

हेही वाचा :

The post संत निवृत्तीनाथ यात्रोत्सव : 'ज्ञानोबा तुकाराम'च्या जयघोषाने दुमदुमले त्र्यंबकेश्वर appeared first on पुढारी.

Exit mobile version