नाशिक : येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांतर्गत होणारे कविसंमेलन आकर्षणाचा केंद्र ठरावे, यासाठी चोख नियोजन केले जात आहे. या अनुषंगाने रविवारी (ता. ३१) संमेलनाच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या बैठकीत विविध समित्या गठित झाल्या.
संमेलनात ‘काव्य कट्टा’ हे कविसंमेलन २३ तास चालणार आहे. सुमारे ४६० कवींना आपली कविता या व्यासपीठावरून सादर करण्याची संधी मिळणार असून, त्यासाठी प्रवेशिका फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यपर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत.
प्रतिसाद पाहता वेळही वाढणार
साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रापूर्वी कविसंमेलन घेण्याबाबत महामंडळाने परवानगी दिलेली नसल्याचे निदर्शनात आणून दिले. यानंतर चर्चेअंती कविसंमेलन ३९ ऐवजी २३ तास घेण्याचे निश्चित करण्यात आले. प्रवेशिकांचा प्रतिसाद पाहता, वेळ वाढविण्यासंदर्भात विचार केला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले. प्रवेशिका मागविण्यापासून, कवी-कवयित्रींना संपर्क साधणे व प्रत्यक्षात कविसंमेलनाच्या नियोजनासंदर्भात व्यापक चर्चा या वेळी झाली. नाशिकच्या कवींना जास्तीत जास्त संधी दिल्या जाणार असल्याचेही नमूद केले. रविवारी झालेल्या बैठकीस अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे प्रतिनिधी राजन लाखे आणि प्रसाद देशपांडे यांच्यासह प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, प्रा. डॉ. वेदश्री ढिगळे, कवी प्रकाश होळकर उपस्थित होते. लाखे यांनी यापूर्वी झालेल्या संमेलनांमधील कवी कट्ट्याच्या नियोजनाचे अनुभव विशद केले.
हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल
४६० कवींना मिळेल संधी
संमेलनाच्या पहिल्या दिवशी २६ मार्चला उद्घाटनानंतर सायंकाळी सहा ते रात्री दहा, २७ मार्चला सकाळी आठ ते रात्री दहा आणि समारोपाच्या दिवशी २८ मार्चला सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत कवी कट्टा बहरणार आहे. एका तासाला सरासरी २० कवी कविता सादर करतील. २३ तासांत ४६० कवींना कविता सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. तसेच कविसंमेलनातून पुढील संमेलनात कविता सादरीकरणासाठी काही कवी-कवयित्रींची निवड केली जाईल.
हेही वाचा - बालविवाह झालेल्या 'त्या' दुर्दैवी मुलीचा मृत्यू; आईची सासू-सासऱ्यांविरोधात तक्रार
अशा आहेत विविध समित्या
नोंदणी समिती - संतोष वाटपाडे, वैजंती सिन्नरकर, नंदकिशोर ठोंबरे, पूजा बागूल, निवड समिती- संतोष वाटपाडे, काशीनाथ वेलदोडे, विजयकुमार मिठे, अलका कुलकर्णी, माणिकराव गोडसे, नितीन कोकणे, संपर्क समिती- नंदकिशोर ठोंबरे, प्रा. रविकांत शार्दुल, नानासाहेब गिरी, सविता पोतदार, रवींद्र दळवी, किरण सोनार, चेतन पनेर, विलास पंचभाई, राजेंद्र चिंतावार, अलका कोठावदे, सूत्रसंचालन समिती- चेतन पनेर, भाग्यश्री गुजर, मयूरी धुमाळ, डॉ. प्रतिभा जाधव, डॉ. मिलन खोटर, मंच व्यवस्थापन- सविता पोतदार, राजेंद्र चिंतावार, विलास पंचभाई, सभागृह व्यवस्थापन- अजय बिरारी, रवींद्र दळवी, अमोल चिबे, श्री. विशाल, प्रमाणपत्र समिती- श्री. अर्जुन, संजय गोरडे, रविकांत शार्दुल, अल्का कुलकर्णी, बलराम कांबळे, काव्य दर्शन- संजय गोरडे, प्रणाली, विलास पंचभाई, अमोल चिबे, अजिंक्य ढिगळे, वर्षा शिदोरे, मनीषा पाटील, आकाश तोटे, पलश तांदळे, सर्वेश साबळे.