सक्तीची कर्जवसुली, लिलाव थांबवा; शेतकरी संघटनेचे पालकमंत्र्यांना साकडे 

कसबे सुकेणे (जि.नाशिक) : नाशिक जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना थकीत कर्ज वसुलीसाठी नोटिसा पाठवल्या आहेत. प्रसंगी शेतकऱ्यांच्या मालमत्ता जप्त करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. यासंदर्भात शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, जिल्हा शेतकरी संघटनेने पालकमंत्री छगन भुजबळ यांना घेराव घालून जिल्हा बँकेने थकीत कर्जदार शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीसाठी व त्यांच्या जमिनीच्या लिलाव करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे संबंधित वसुली व लिलाव थांबवावेत, या मागणीचे निवेदन शेतकरी संघटनेने पालकमंत्री छगन भुजबळ यांना दिले. 

शेतकरी संघटनेचे पालकमंत्र्यांना साकडे 
मार्च २०२० पासून लॉकडाउन सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. शेतमाल वाहतूकही ठप्प झाली. अनेक ठिकाणी शेतीमाल सडून गेला. टोमॅटो, कांदा, भाजीपाला खराब झाला. शेतकऱ्यांना दूध फेकून देण्याची वेळ आली. द्राक्ष मातीमोल विकावे लागले. कापूस, सोयाबीन, कांदा तसेच इतर फळे सडून गेली. निर्यातक्षम द्राक्षांना तडे गेल्याने ते मातीमोल विकावे लागले. शासनाने कांदा निर्यातबंदी घडवून आणली. अशा परिस्थितीत शेतकरी कर्जबाजारी झाला असतानाच जिल्हा बँकेने शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव काढले. एवढे मोठे संकट असताना शेतकरी मदतीची वाट पाहत आहे. अशा परिस्थितीत जिल्हा बँकेने जमिनीचे लिलाव काढणे म्हणजे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यासारखे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. 

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल
निवेदनावर शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुनतात्या बोराडे, संतू झांबरे, बापूसाहेब पगारे, शंकर पुरकर, संतू बोराडे, रामकृष्ण बोंबले, सुखदेव पागिरे, दत्तू गवारे, शंकर बोराडे, भीमराव बोराडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.  

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल