सक्तीने वसुलीसाठी बळीराजाच दिसतो का? शेतकरी संघटनेची मागणी 

येवला (जि.नाशिक) : विविध आपत्तीमुळे शेतकरी त्रस्त असताना आता वीजबिल वसुलीसाठी महावितरण रोहित्र बंद करत आहे. तर कुठे वीजजोडणी तोडत आहे. अशीच सक्ती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज वसुलीसाठी सुरू आहे. सक्तीने वसुली करण्यासाठी बळीराजाच का, असा सवाल करून ही सक्तीची वसुली त्वरित थांबविण्याची मागणी शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेने केली आहे. 

सक्तीची वसुली त्वरित थांबविण्याची मागणी
तालुक्यात महावितरण कंपनीने रोहित्र (ट्रान्स्फॉर्मर) बंद करण्याची मोहीम हाती घेतली आहे. निवडणूक काळात प्रत्येक पक्ष शेतकऱ्यांना मोफत वीज, सातबारा कोरा अशा घोषणा करतात; मात्र आता शेतकऱ्यांचे रोहित्र बंद करून हाताशी आलेले पीक वाया जाण्याची दहशत वीज वितरण कंपनी करत असताना राजकीय पदाधिकारी कानावर हात ठेवून आहेत. वीजबिल वसुली तत्काळ थांबवावी व शेतकऱ्यांना संपूर्ण वीजबिलमुक्त करावे. कारण शेतकऱ्यांच्या नावाने केंद्र सरकार किती अनुदान वीज वितरण कंपनीला देते? महावितरण कंपनी शेतकऱ्यांना जर आठ तास वीज देते, मग शेतकऱ्यांना बारा महिने व चोवीस तासांचे बिल कसे लावते? किती शेतकऱ्यांना मीटरप्रमाणे वीजपुरवठा केला जातो? मनात येईल त्या पद्धतीने बिल आकारणी केली जात आहे. या प्रकाराने शेतकरी हैराण झाला असून, त्याला कुणी वाली नसल्याचे चित्र आहे. नाइलाजाने शेतकरी उधार-उसनवारी करून बिल भरण्यासाठी रांगेत उभा दिसतो आहे. 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

उत्तर प्रशासन देत नाही

शेजारील तालुक्यात शासनाच्या धोरणाप्रमाणे वीजपुरवठा खंडित केलेला नाही. मात्र येवल्यातच ही खास मोहीम का राबविण्यात येत आहे, याचे उत्तर प्रशासन देत नसल्याचे संघटनेने म्हटले आहे. कोरोना काळात देशाची अर्थव्यवस्था तारली त्याच्याच जिवावर शासनाची महावितरण कंपनी उठल्याचे म्हटले आहे.  

हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले

तहसीलदारांना मागणीचे निवेदन

येथे तहसीलदार, तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांना या मागणीचे निवेदन दिले आहे. शेतकरी संघटनेचे नेते संतू पाटील झांबरे, सुभाष सोनवणे, अनिस पटेल, बापूसाहेब पगारे, अरुण जाधव, बाळासाहेब गायकवाड, मधुकर गायकवाड, जाफर पठाण, आनंदा महाले, एकनाथ गायकवाड, विठ्ठल वाळके, योगेश सोमवंशी, शिवाजी वाघ, पांडुरंग गायके आदी शेतकरी उपस्थित होते.