सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न 

वडेल (जि.नाशिक) : हर्षल व रितेशच्या आई-वडिलांच्या आर्त टाहोने उपस्थितांचे डोळे पाणावले. हर्षल नाशिकला एका नामांकित महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात शिकत होता. तर, रितेश मालेगाव येथे बारावीत होता. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर मुलाची संसाराला मदत होईल व कष्टातून उभा केलेला संसार फुलेल, असे सोनेरी स्वप्न उराशी बाळगून असणाऱ्या आई-वडिलांचा टाहो काळीज हेलावणारा होता

दोन सख्ख्या भावंडाची एकत्रच अंत्ययात्रा 
अजंग येथील इंदिरानगर परिसरातील देवीदास जाधव यांची मुले हर्षल (वय २२) व रितेश (१८) बुधवारी निमशेवडी येथे मित्राच्या विवाह सोहळ्यासाठी गेले होते. विवाहानंतर तेथून जवळच असलेल्या विराणे शिवारातील बोरी नदीवरील धरणाजवळ हे दोघे भाऊ गेले. त्या वेळी धरणावर असलेल्या सुरकुंडीवरून रितेशचा पाय घसरल्याने तो पाण्यात पडून बुडत असताना, त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात हर्षलनेही पाण्यात उडी घेतली. मात्र, पोहता येत नसल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. विराणे, लुल्ले, निमशेवडी, गरबड व परिसरातील गावांत ही माहिती पोचताच तेथील नागरिकांनी धरणाकडे धाव घेऊन दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत दोघा भावांचा मृत्यू झाला होता. वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्‍वर मोताळे व सहकारी तपास करीत आहेत. 

 हेही वाचा - स्‍वयंपाकगृह ते थेट 'CA'! गिरणी व्‍यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी

वडेल पंचक्रोशीत हळहळ

अजंग (ता. मालेगाव) येथील दोन भावांचा विराणे शिवारातील बोरी नदीवरील धरणात बुडून मृत्यू झाला. बुधवारी (ता. २४) दुपारी तीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. दोघा सख्ख्या भावांच्या मृत्यूमुळे वडेल पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रात्री उशिरा दोघांवर अजंग येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ

भाऊ आम्ही आता कोणासाठी जगू? 
हर्षल व रितेशच्या आई-वडिलांच्या आर्त टाहोने उपस्थितांचे डोळे पाणावले. हर्षल नाशिकला एका नामांकित महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात शिकत होता. तर, रितेश मालेगाव येथे बारावीत होता. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर मुलाची संसाराला मदत होईल व कष्टातून उभा केलेला संसार फुलेल, असे सोनेरी स्वप्न उराशी बाळगून असणाऱ्या आई-वडिलांचा टाहो काळीज हेलावणारा होता. दोन्ही मुलांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने जाधव कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 
हर्षल व रितेशचे वडील एका संस्थेत शिक्षक असून, बरीच वर्षे विनाअनुदान तत्त्वावर काम करताना केशकर्तनाचा परंपरागत व्यवसाय करीत कुटुंबाची गुजराण ते करत होते. त्यातून, त्यांच्या संसाराची आता कुठे घडी बसली होती. त्यातच काळाने अचानक घाला घातल्याने जाधव कुटुंबीय उन्मळून पडले आहे. दोन्ही कर्ती मुले गमावल्याने श्री. जाधव व त्यांच्या पत्नीचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. अजंग ग्रामस्थही या दुर्घटनेने सुन्न झाले आहेत.