सटाणा नगराध्यक्षांचा राजीनामापत्र व्हायरल! सोशल मीडियावर व्हायरल; पालिकेच्या वर्तुळात खळबळ

सटाणा (जि.नाशिक) : येथील नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी गुरुवारी (ता. १८) पदाचे राजीनामापत्र सोशल मीडियावर व्हायरल केल्याने पालिकेच्या वर्तुळात खळबळ उडाली असून, चर्चेला उधाण आले आहे. 

सटाणा नगराध्यक्ष मोरे यांचे राजीनामापत्र व्हायरल 
२०१६ मध्ये झालेल्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत स्थानिक शहर विकास आघाडी स्थापन करून सुनील मोरे यांनी सत्ता काबीज केली होती. निवडणुकीत दिलेल्या वचननाम्याप्रमाणे शहराला संजीवनी ठरणारी पुनंद पाणीपुरवठा योजना मार्गी लागल्याने साहजिकच मोरे यांची प्रतिमा उंचावून त्यांनी नावलौकिक मिळविला असताना गुरुवारी अचानक मोरे यांनी सोशल मीडियावर राजीनामापत्र व्हायरल केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. श्री. मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात वैयक्तिक प्रकृतिअस्वास्थ्यामुळे मला अध्यक्षपदाचे कामकाज करणे शक्य नसल्याने मी पदाचा राजीनामा देत आहे, तो स्वीकारावा, असा उल्लेख आहे. त्या पत्राची प्रत मुख्याधिकारी हेमलता डगळे यांच्याकडेही दिली आहे. 

हेही वाचा - अखेर 'त्या' तरुणीच्या मृ्त्यूचे गूढ उकलले; पोलिसांकडून २४ तासात संशयितांना बेड्या 

नॉट रिचेबल; अधिकाऱ्यांकडून दुजोरा नाही 
सुनील मोरे यांनी व्हायरल केलेल्या राजीनामापत्राबाबत मोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल रात्री उशिरापर्यंत नॉट रिचेबल होता, तर पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे-हिले यांच्याशी संपर्क साधला असता हा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांशी निगडित असून, माझ्याकडे या राजीनामापत्राची कोणतीही प्रत इनवर्ड झालेली नसल्याने याबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे डगळे यांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा - इगतपुरीच्या ३०० फूट खोल दरीत तब्बल ११ तासांचा थरार! अखेर रेस्क्यू टिमच्या प्रयत्नांना यश

राजीनामानाट्य 
सटाणा शहरात नगराध्यक्ष मोरे यांच्या राजीनामानाट्याची सर्व स्तरांत चर्चा होती. ३ फेब्रुवारीला झालेल्या राज्यपालांच्या हस्ते देवमामलेदारांच्या स्मारकाच्या खर्चाच्या प्रकरणावरून तर राजीनामा झाला नसेल ना, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. दुसरीकडे श्री. मोरे यांचे राजीनामानाट्य ही निव्वळ स्टंटबाजी असल्याचे बोलले जात आहे.