सटाणा पालिकेची निवडणूक महाविकास आघाडी लढणार; राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय 

सटाणा (जि. नाशिक) : आठ महिन्यांनंतर होऊ घातलेल्या सटाणा पालिकेच्या निवडणुकीला महाविकास आघाडीने एकत्रित सामोरे जावे, असा एकमुखी निर्णय सटाणा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील हॉटेल साहेब येथे सटाणा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. 

मतभेद विसरून कामाला लागावे

माजी आमदार चव्हाण म्हणाले, की राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने शहरातील विकासकामांना जास्तीत जास्त निधी उपलब्ध करता येईल. शहराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली व पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडणाऱ्या ऐतिहासिक पुनंद पाणीपुरवठा योजनेसाठी तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळातच या धरणातील पाण्याचे आरक्षण मंजूर केले होते. याचवेळी शासनाकडे पुनंद योजनेचा आराखडाही सादर केला होता. आता ही योजना मार्गी लागत असल्याने जनतेला याची जाणीव आहे. गेल्या निवडणुकीआधी पालिकेत वीस कोटींचा भरीव निधी शिल्लक ठेवल्यानेच शहरातील विकासकामे होऊ शकली, ही वस्तुस्थिती कार्यकर्त्यांनी जनतेला लक्षात आणून द्यावी. तसेच मतभेद विसरून कामाला लागावे आणि आपल्या प्रभागातील जनतेशी संपर्क वाढवावा, असे आवाहनही चव्हाण यांनी केले.

माजी आमदार संजय चव्हाण अध्यक्षस्थानी होते. तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ, पांडुरंग सोनवणे आदी उपस्थित होते.

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक सदस्य निवडून आले आहेत. महाविकास आघाडीने निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविले आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्रित व संघटित होऊन निवडणुकीला सामोरे गेल्यास पालिकेवर आघाडीचा झेंडा फडकेल, असा सूर अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. तालुकाध्यक्ष सूर्यवंशी, शहराध्यक्ष सोनवणे, रत्नाकर सोनवणे, दगाजी सोनवणे, जनार्दन सोनवणे आदींची भाषणे झाली. 

नगरसेविका सुरेखा बच्छाव, शमा मन्सुरी, भरत खैरनार, जिभाऊ सोनवणे, आरिफ मन्सुरी, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष सुमीत वाघ, मोहन खैरनार, रोहित आहिरे, प्रसाद दळवी, सुयोग आहिरे, मंजूर शेख, फईम शेख, माधव सोनवणे, मिलिंद शेवाळे, सुरेश सोनवणे, राजेंद्र सावकार, दादू सोनवणे, उषा भामरे, वंदना भामरे, सागर वाघ आदी उपस्थित होते.  

हेही वाचा - बालविवाह झालेल्या 'त्या' दुर्दैवी मुलीचा मृत्यू; आईची सासू-सासऱ्यांविरोधात तक्रार