सटाण्यात कांद्याचे लिलाव ठप्प; महाविकास आघाडीतर्फे कांद्याच्या माळा घालून निदर्शने

सटाणा (जि.नाशिक) : गेल्या दहा दिवसांपासून बागलाण तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमधील कांद्याचे लिलाव ठप्प असल्याने शेतकर्‍यांचा कांदा शेतामध्ये सडत आहे. गारपीट, अवकाळी पाऊस आणि संभाव्य लॉकडाउनचे संकट यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. बाजार समिती प्रशासनाच्या निषेधार्थ बागलाण तालुका महाविकास आघाडीतर्फे कांद्याच्या माळा घालून आज गुरुवार (ता.१) रोजी येथील बागलाण तहसील कार्यालय आवारात घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली.

कांदा लिलाव तातडीने सुरू करण्याच्या सूचना

प्रशासनाने बाजार समित्यांमधील कांदा लिलाव प्रक्रिया तत्काळ सुरू करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा संतप्त इशाराही महाविकास आघाडीतर्फे तहसिलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांना निवेदनाद्वारे देण्यात आला. दरम्यान, तहसिलदार इंगळे-पाटील यांनी तत्काळ सटाणा व नामपुर बाजार समित्यांच्या सचिवांशी फोनद्वारे संपर्क साधून कांदा लिलाव तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड

बाजार समिती प्रशासनाच्या निषेधार्थ तीव्र घोषणाबाजी
आज (ता.१) दुपारी एक वाजता बागलाण तालुका महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस या तीनही पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून तहसील कार्यालय आवारात प्रवेश केला. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकर्‍यांनी बाजार समिती प्रशासनाच्या निषेधार्थ तीव्र घोषणाबाजी सुरू केली. यानंतर पदाधिकार्‍यांनी तहसिलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली आणि निवेदन दिले. निवेदनात, गेल्या दहा दिवसांपासून बाजार समित्या बंद असल्याने कांद्याचे लिलाव ठप्प आहेत. शेतकर्‍यांनी लिलावासाठी आपल्या शेतात काढून ठेवलेला कांदा आता सडू लागला आहे. त्यामुळे कांदा दरात मोठी घसरण होण्याची शक्यताही आहे.

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण 

अन्यथा तीव्र आंदोलन

मका, द्राक्षे, डाळिंब, कडधान्य आदींचे व्यवहार सुरळीत असताना कांद्याचे लिलाव बंद ठेवून शेतकर्‍यांना वेठीस धरले जात आहे. दहा दिवसांनंतर बाजार सुरू होताच आवक वाढेल आणि मागणी व पुरवठा यांचे गणित बिघडून मातीमोल दरात कांद्याची विक्री करण्याची वेळ उत्पादक शेतकर्‍यांवर येणार असल्याने याचा फायदा व्यापार्‍यांना होणार आहे. नैसर्गिक संकटाशी सामना करणारा बळीराजा सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. बाजार समित्या तत्काळ सुरू झाल्या नाहीत तर शेतकर्‍यांचा उद्रेक वाढणार असल्याने प्रशासनाने तातडीने कांदा लिलाव सुरू करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. 

 

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ, बाजार समितीचे माजी संचालक अनिल चव्हाण, दीपक रौंदळ, सुभाष नंदन, शरद शेवाळे, सुमित वाघ, संदीप अहिरे, बाळासाहेब मोरे, गणेश देसले, अजय सोनवणे, गौरव बागूल, राजनसिंग चौधरी, राजू जगताप, दादू सोनवणे, ज.ल.पाटील, आनंद सोनवणे, विक्रांत पाटील, रवी मराठे, दिलीप शेवाळे, मनोज ठोळे, स्वाभिमानीचे रमेश अहिरे आदींसह शेतकरी उपस्थित होते. 

छायाचित्र : 
सटाणा : बाजार समिती प्रशासनाच्या निषेधार्थ बागलाण तालुका महाविकास आघाडीतर्फे गळ्यात कांद्याच्या माळा घालून घोषणाबाजी करताना पदाधिकारी तर तहसिलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांना निवेदन देताना शैलेश सूर्यवंशी, किशोर कदम, लालचंद सोनवणे, राजेंद्र सोनवणे, विजयराज वाघ, अनिल चव्हाण आदि.  (छाया : रोशन खैरणार)