सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांनी जागता पहारा

०१५७९ 

सटाणा (जि.नाशिक) : एक आठवड्यापासून रोज रात्री आठनंतर कचेरी रोड परिसरात विचित्र प्रकार घडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. रात्रीचे आठ वाजले, की परिसरात प्रचंड दहशत पसरते. परिसरातील लहान बालकांना सातच्या आत घरात राहावे लागत आहे. असे काय घडले?

लहान बालके सातच्या आत! युवकांचा जागता पहारा

शहरातील कचेरी रोड परिसरामध्ये आठ दिवसांपासून मध्यरात्री घरांवर अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक केली जात असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. नगरसेवक राकेश खैरनार व नगरसेविका भारती सूर्यवंशी यांच्यासह शेकडो युवकांनी जागता पहारा सुरू केला आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी सटाणा पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविली आहे. 

माथेफिरूकडून घरांवर दगडफेकीचा विचित्र प्रकार
एक आठवड्यापासून रोज रात्री आठनंतर कचेरी रोड परिसरात अज्ञात माथेफिरूकडून घरांवर दगडफेकीचा विचित्र प्रकार घडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. रात्रीचे आठ वाजले, की कचेरी रोड परिसरात प्रचंड दहशत पसरते. परिसरातील लहान बालकांना सातच्या आत घरात राहावे लागत आहे. एका घरावर दगडफेक होताच स्थानिक युवक दगड येण्याच्या दिशेने धाव घेताच विरुद्ध दिशेच्या घरावर दगडफेक होत असल्याने सगळेच चक्रावून जात आहेत.

 

या घटनेमुळे नगरसेवक राकेश खैरनार व नगरसेविका भारती सूर्यवंशी यांच्यासह दीडशे ते दोनशे युवकांचा परिसरात व घरांच्या छतावर खडा पहारा असतानाही दर दहा ते पंधरा मिनिटांत दगड पडण्याचा आवाज येतो आहे. संबंधित माथेफिरूचा दगडफेक करण्याचा नेमका उद्देश काय? हा प्रश्नही अनुत्तरित असून, स्थानिक नागरिकांनी सटाणा पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या गंभीर प्रकरणाचा पोलिसांनी सखोल तपास करण्याची मागणीही स्थानिक नागरिकांनी केली आहे.