”सत्ता प्रकारातील त्रुटीमुळे नागरिकांना वेठीस धरू नका”; कृषिमंत्री दादा भुसे यांचे निर्देश

मालेगाव,( जि. नाशिक) : शहर व परिसरातील ब-सत्ताप्रकार अथवा अन्य कोणताही सत्ताप्रकार म्हणून नोंदविलेल्या जमिनींचे भोगवटादार वर्ग-१ या धारणाधिकारामध्ये रूपांतरण करण्याबाबत शासन आदेश निर्गमित झाले आहेत.

कृषिमंत्री दादा भुसे यांनी अधिकाऱ्यांना दिले निर्देश 

त्यामुळे सत्ताप्रकारातील त्रुटीमुळे नागरिकांना वेठीस धरू नका , येथील शासकीय विश्रामगृहावर भोगवटादार वर्ग-२ (ब सत्ताप्रकार-बी२) जमिनी वर्ग-१ मध्ये रुपांतरित करण्याबाबत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. दादा भुसे म्हणाले, की सत्ताप्रकारातील त्रुटीच्या प्रकरणातील सुमारे ५० ते ७५ टक्के प्रकरणांचा निपटारा हा १५ मार्चच्या शासन आदेशानुसार होईलच. उर्वरित प्रकरणांसाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील. ब-सत्ता मिळकतीबाबत मूळ धारकाच्या रक्तनातेसंबंधातील वारसांची नावे मिळकत पत्रिकेवर लावण्याबाबतही आजच्या बैठकीत निर्णय झाला.

वाढत्या तक्रारींबद्दल भुसे यांनी नाराजी

नगर भूमापन कार्यालयाच्या कामकाजाबाबत वाढत्या तक्रारींबद्दल श्री. भुसे यांनी नाराजी व्यक्त केली. महसूल व नगर भूमापन विभागाने समन्वय साधत सातबारा उतारा व मिळकत पत्रिकेत मेळ घालून नागरिकांना दिलासा देण्याचे काम करावे. सत्ता प्रकारातील दुरुस्तीची प्रकरणे जमा करण्यासाठी एक खिडकी योजना कार्यान्वित करून नागरिकांची कामे सुलभ करीत लोकाभिमुख प्रशासनाची अनुभूती द्यावी. कोरोनाच्या महामारीचा मुकाबला करताना शासनाच्या तिजोरीवरील बोजा वाढला असून, सत्ताप्रकार बदलामुळे शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळेल. नागरिकांचेही प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील. नगर भूमापन कार्यालयाने तत्काळ या शासन आदेशाची अंमलबजावणी करत महिनाभरात प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावावेत. 

‘ब’ सत्ता प्रकार बदलाबाबत विहित नमुन्यातील अर्ज, मिळकतीचे मूल्यांकन, सहधारकांचे संमतीपत्र, जागेचा नकाशा, मिळकत पत्रिकेची नक्कल या कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत. अशा मिळकतींवर रक्तनातेसंबंधातील वारसाचे नाव लावण्यासाठी वाटपपत्र, बक्षीसपत्र, वारस नोंद, मृत्यू दाखला, वारसदारांच्या हमीपत्रासह परिपूर्ण प्रस्ताव सादर केल्यास २१ दिवसांत मिळकत पत्रिकेवर नोंद घेण्यात येईल. 
- जितेंद्र भिंगारदिवे, नगर भूमापन अधिकारी  

अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजित राजपूत, नगर भूमापन अधिकारी जितेंद्र भिंगारदिवे, उपअधीक्षक भूमिअभिलेख भगवान शिंदे, सहायक दुय्यम निबंधक पी. एन. लहाने, एस. व्ही. वाघ, पी. डी. वाघचौरे आदी अधिकारी उपस्थित होते.