सत्यजितसाठी भाजपची माघार, पुत्रप्रेमापोटी सुधीर तांबेंनीही भरला नाही अर्ज; सत्यजित यांची अपक्ष उमेदवारी

Satyajeet Tambe

नाशिक : पुढारी वृत्तसेवा, विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत गुरुवारी (दि. १२) अर्ज दाखल करण्याच्या अखरेच्या दिवशी ट्विस्ट पाहायला मिळाला. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी पुत्र सत्यजित यांच्या प्रेमापोटी अखेरच्या क्षणी निवडणुकीतून माघार घेतली. सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. भाजपने अखेरपर्यंत उमेदवार न दिल्याने तांबेंच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. निवडणुकीसाठी अखेरच्या दिवशी २० उमेदवारांनी ३१ अर्ज दाखल केले.

विधान परिषदेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट

राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक पदवीधर निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या. विभागीय महसूल आयुक्तालयात दिवसभरात २० उमेदवारांचे एकूण ३१ अर्ज प्रशासनाकडे दाखल झाले असले, तरी चर्चा मात्र तांबे पिता-पुत्राच्या अर्ज भरण्यावरूनच रंगली होती. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. तांबे यांनी त्यांच्याकडे पक्षाचा ‘एबी’ फॉर्म असूनदेखील अंतिम क्षणापर्यंत अर्ज दाखल केला नाही. त्यांचे पुत्र सत्यजित यांनी काँग्रेस व अपक्ष म्हणून दोन अर्ज दाखल केले असले, तरी त्यांच्याकडे पक्षाचा अधिकृत ‘एबी’ फॉर्म नसल्याने त्यांचा अर्ज अपक्ष असेल. मात्र, या सर्व घडामोडीत गाफील राहिलेल्या काँग्रेससाठी ही धक्कादायक बाब आहे. दुसरीकडे, उमेदवारावरून अखेरपर्यंत भाजपनेही त्यांचे पत्ते उघड केलेले नाहीत. निवडणुकीत नगरमधील राजेंद्र विखे-पाटील यांचे नाव आघाडीवर असले, तरी ते फक्त चर्चेपुरते मर्यादित ठेवण्यात भाजप यशस्वी ठरला.

निवडणुकीत अर्ज दाखल केलेल्या अन्य उमेदवारांमध्ये धुळ्याचे धनराज विसपुते यांनी भाजप आणि अपक्ष असे दोन अर्ज भरले असले, तरी त्यांनी भाजपचा ‘एबी’ फॉर्म अर्जासोबत जोडलेला नाही. बसपकडून शरद तायडे हे रिंगणात उतरले आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून नाशिकचे रतन बनसोड यांनी, तर नाशिकचेच दादासाहेब पवार यांनी हिंदुस्थान जनता पार्टी पक्षातून अर्ज भरला. याशिवाय अपक्ष अर्ज भरणाऱ्यांमध्ये नितीन सरोदे, राजेंद्र निकम, बाळासाहेब घोरपडे, इरफान मोहमद इसाक, यशवंत साळवे (सर्व नाशिक), संजय माळी (जळगाव), भागवत गायकवाड, डॉ. सुधीर सुरेश तांबे (पनवेल, जि. रायगड), पोपटराव बनकर, सुभाष जंगले, अमोल खाडे, सुनील उदमले, छगन पानसरे, धनंजय जाधव (सर्व नगर), अविनाश माळी (नंदुरबार), राजेंद्र भावसार (धुळे), अनिल तेजा आदींचा समावेश आहे.

पदवीधरसाठी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसापर्यंत प्रशासनाकडे २९ उमेदवारांनी ४४ नामनिर्देशनपत्रे दाखल केली, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त रमेश काळे यांनी दिली आहे. शुक्रवारी (दि. १३) अर्ज छाननी होणार असून, १६ तारखेपर्यंत माघारीची मुदत असेल.

Satyajeet Tambe :फडणवीसांनी आधीच दिला होता इशारा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित तांबे यांच्याबाबत बाळासाहेब थोरात यांना गेल्या महिन्यातच सूचक इशारा दिला होता. सत्यजित तांबे यांनी आपल्या सिटिझन विल या पुस्तकाचे प्रकाशन फडणवीस यांच्या उपस्थित पार पाडले. फडणवीस यांनी बोलताना बाळासाहेब थोरात यांना उद्देशून सत्यजित तांबे यांना अजून किती दिवस सभागृहाच्या बाहेर ठेवणार? असा सवाल केला होता. आमच्यासारख्यांचा अशा चांगल्या नेत्यांवर डोळा असतो. चांगली माणसे जमवावीच लागतात, असे फडणवीस म्हणाले होते.

नव्या दमाच्या उमेदवाराला संधी मिळावी, यासाठी सत्यजित तांबे यांना उमेदवारी देऊ केली आहे. काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी देण्यासाठी चर्चा सुरू होती. मात्र, माझ्या नावाने ‘एबी’ फॉर्म आल्याने गोंधळ झाला. ही निवडणूक पक्षचिन्हावर नसते. त्यामुळे सर्वपक्षीय नेते सत्यजित यांना मदत करतील.
– डॉ. सुधीर तांबे, माजी आमदार तथा काँग्रेसचे माघार घेतलेले उमेदवार

पदवीधर मतदारसंघात मी उमेदवारी करावी, अशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यापासून अनेक वरिष्ठांची इच्छा होती; पण तांत्रिक कारणास्तव पक्षाचा ‘एबी’ फॉर्म न मिळाल्याने अपक्ष उमेदवारी करावी लागणार आहे. भाजप, मनसे, राष्ट्रवादी, रासप यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांच्या वरिष्ठांची भेट ही निवडणूक बिनविरोध व्हावी, याकरिता विनंती करणार आहे.
– सत्यजित तांबे, अपक्ष उमेदवार

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी भाजपने कुणाही उमेदवाराला अधिकृत ‘एबी’ फॉर्म दिलेला नाही. सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज केल्याचे समजते आहे. तांबे यांनी प्रत्यक्ष येऊन निवडणुकीत पाठिंबा मागितल्यास भाजपकडून त्याचा विचार करण्यात येईल.

– चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

भाजपचे पक्षश्रेष्ठी देतील त्या उमेदवाराचे निवडणुकीत काम करू. मतदारसंघासाठी अनेक इच्छुक होते. परंतु, पक्ष काय निर्णय घेतो, हे पाहणे महत्त्वाचे असून, त्याबाबत उद्यापर्यंत स्पष्टता येईल. भाजपकडून पाठिंबा देण्याबाबत सत्यजित तांबे यांच्याशी माझी चर्चा झालेली नाही.
– राधाकृष्ण विखे-पाटील, महसूलमंत्री, महाराष्ट्र राज्य

The post सत्यजितसाठी भाजपची माघार, पुत्रप्रेमापोटी सुधीर तांबेंनीही भरला नाही अर्ज; सत्यजित यांची अपक्ष उमेदवारी appeared first on पुढारी.