सध्याचे मुख्यमंत्री हे फक्त मराठा समाजाचे, असेच गुलाबरावांना म्हणायचंय का?

रोहित पवार,www.pudhari.news

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क 

जळगावात एका कार्यक्रमात बोलताना, एक मराठा चेहरा आमच्या शिवसेनेतून बाहेर गेला त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं. गुलाबरावांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे.

जेव्हा सगळ्या गोष्टी हाताबाहेर जातात तेव्हा अशा पद्धतीचे वक्तव्य केले जातात. कदाचित गुलाबरावांचे असे मत आहे का? की आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत ते फक्त मराठा समाजाचे आहेत. पण कर्तृत्व काहीच नाही. असेच गुलाबरावांना म्हणायचंय का असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे. रोहित पवार हे नाशिक दौ-यावर असून माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला केंद्र शासनाने मंजुरी दिल्यानंतर राज्यभर भाजप व शिंदे गटाकडून जल्लोष सुरु आहे. आता यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.  आपण सगळ्यांनी मिळून अशा निर्णयाच्या पाठिमागे जरुर उभे राहिले पाहिजे. परंतु, नामांंतर हा एकच विषय सातत्याने घेतला जातोय. त्यामुळे  राज्यातील इतर प्रश्नांकडे दुर्लक्ष होतय. केवळ भावनिक राजकारण केलं जातय त्याला विरोध करायला हवा असे रोहित पवार म्हणाले.

महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून सगळे मंत्री दोन मतदारसंघात…

पुण्यातील कसबा व पिंपरी चिंचवड पोटनिवडणूकीबाबत विचारले असता पवार म्हणाले, तिथे मतदारांना पैसे वाटले जाताय असे कानावर आले आहे, लोकांमध्येही तशी चर्चा आहे. गेल्या दहा दिवसांपासून राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सगळे मंत्री दोन मतदार मतदारसंघात फिरताय. त्यांनी सगळ्या महाराष्ट्राला वा-यावर सोडलय.  त्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर अर्थकारणाचा वापर केला जात असेल तर मग लोकशाही कुठे राहीली. संविधान कुठे राहिलं असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अपक्षांना देखील मत विभाजन करण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून निधी दिला जातोय. वंचित आघाडी देखील भाजपलाच मदत करत असल्याचं दिसतय असे रोहित पवार म्हणाले.

हेही वाचा : 

The post सध्याचे मुख्यमंत्री हे फक्त मराठा समाजाचे, असेच गुलाबरावांना म्हणायचंय का? appeared first on पुढारी.