सप्तशृंगगडावर आदिमायेचा जयघोष! शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त दत्त अंबिका यागास प्रारंभ 

वणी (जि.नाशिक) : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त मंत्रघोषात व आदिमायेच्या जयघोषात त्रिदिवसीय दत्त अंबिका यागास उत्साहात सुरवात झाली. 

त्रिदिवसीय दत्त अंबिका यागास सुरवात
गडावर आदिमायेच्या शाकंभरी नवरात्रोत्सव २१ जानेवारीपासून सुरू असून, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टतर्फे मंगळवार (ता. २६)पासून श्रीदत्त अंबिका यागास उत्साहात सुरवात झाली. मंगळवारी सकाळी पुरोहितांना ट्रस्टतर्फे वर्दी देऊन निमंत्रित करण्यात आले. यानंतर शिवालय तलावावर प्रायच्चित संकल्प सोडला जाऊन यजमानांना विडा-सुपारी देण्यात आली. आदिमाया मंदिरात गणपती पूजनाने दत्त अंबिका यागाची सुरवात झाली. पुरोहितांच्या मंत्रघोषात पुण्याहवाचन, षोडशमातृका मंडल स्थापन, आयुष्यमंत्र, नांदी श्राद्ध, आचार्यादी वर्णन, वास्तू मंडल स्थापन, योगिनी स्थापन स्थापन, क्षेत्रपाल मंडल स्थापन, प्रधान मंडल स्थापन, नवग्रह मंडल स्थापन, रुद्र मंडल स्थापन, दत्त अंबिका मूर्तिनाम प्राणप्रतिष्ठा षोडशोपचार पूजन कुशकाण्डिका पूजन अग्निस्थापन, नवग्रह यजन स्थापना, देवतांची सांयम पूजन असे विविध विधी झाल्यानंतर आदिमायेची सांजदीप आरती झाली.

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या

शाकंभरी पौर्णिमेस षोडशोपचारे पूजन

यागासाठी मंदिर सभामंडप आकर्षक रांगोळी, फूलमाळांनी सजविण्यात आला. बुधवारी यागाच्या दुसऱ्या दिवशी स्थापित देवतांना प्रांतपूजन, देवतांना षोडशोपचारे पूजन, धन्वंतरी देवतांना विविध अर्चना, सायंपूजन, धूपदीप आरती असे विधी झाले. गुरुवारी (ता.२८) शाकंभरी पौर्णिमा असून, स्थापित मंडल प्रातपूजन, दत्त अंबिका मूर्तिनाम षोडशोपचारे पूजन, स्थापित देवतांम उतारांग यजन, विशेष हवन, बलिदान, पूर्णाहुती, अभिषेक, धूपदीप महाआरतीने दत्त अंबिका यागाची सांगता होईल. मंगळवारी सुटी आल्याने दिवसभर भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. देवी संस्थांतर्फे भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंगळवारपासून गुरुवार मध्यरात्री एकपर्यंत आदिमायेचे मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले आहे. या उत्सवात भाविकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त, अधिकारी, पुरोहित संघ यांनी केले. 

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच 

शाकंभरी देवीला ‘अन्नपूर्णा’ देवीही म्हटले जाते. दुर्गासप्तशतीमधील मध्यम चरित्रामध्ये शाकंभरी देवीचे चरित्र आहे. या नवरात्रोत्सवात धन्वंतर यागाच्या माध्यमातून देशातील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे, नैसर्गिक संकटे टळावे, पर्यावरण संतुलित राहावे यांसह देशावरील परकीय संकटे, राष्ट्रांतर्गत अस्थिरता थांबून मनुष्य, प्राण्यांसह विश्वात सद्भावना निर्माण व्हावी, यासाठी संकल्प करण्यात आला आहे. 
- प्रसाद दीक्षित, पुरोहित संघ, सप्तशृंगगड