सप्तशृंगगडावर नवीन धरणासाठी चाचपणी;अधिकाऱ्यांकडून जागेची पाहणी

नांदुरी (नाशिक) : पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार सप्तशृंगगडावर भाविक व देवस्थानाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी टोलनाक्यासमोरील नडगीनाला परिसरात धरण बांधण्यासाठी वन विभागाकडून जागा मंजूर झाली आहे. त्याआधारे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली. 

राज्यातील मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली झाल्यानंतर पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील सप्तशृंगगडावर देवीच्या दर्शनासाठी आले असता माजी उपसरपंच गिरीश गवळी व उपसरपंच राजेश गवळी यांच्यासह ग्रामस्थांनी मंत्री पाटील यांची भेट घेऊन नडगीनाला परिसरात नवीन तीन टीएमसी धरण बांधावे, अशी मागणी निवेदन देऊन केली होती. गवळी बंधू, ग्रामपंचायत व ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन पाणीपुरवठामंत्री पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता देवेंद्र लांडगे यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा विभागाला सूचना करीत तत्काळ सर्व्हे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यांच्या सूचनेनुसार गुरुवारी (ता. १०) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता सुबोध मोरे, सहाय्यक अभियंता तन्मय कांबळे, सहाय्यक अभियंता व्ही. एस. टिळे, शाखा अभियंता सुनील चौरे यांनी गड ग्रामपंचायत माजी उपसरपंच गिरीश गवळी, उपसरपंच राजेश गवळी यांच्यासह पाहणी केली. 

हेही वाचा>> पुन्हा पबजी गेमने घेतला जीव? घरात गळफास घेत १४ वर्षीय मुलाची आत्महत्या

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

सप्तशृंगगडावर पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो, मात्र पाणी साठविण्यासाठी भवानी पाझर तलावाव्यतिरिक्त दुसरे साधन नसल्याने संपूर्ण पाणी वाहून जाते. त्यामुळे नडगीनाला परिसरात नवीन धरण बांधल्यास सप्तशृंगगडावरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. या तलावाच्या कामासाठी विशेष बाब म्हणून प्राथमिकता देऊन तत्काळ मंजुरी देण्याचे आश्वासन मंत्री पाटील यांनी ग्रामस्थांना दिले. 

हेही वाचा>> मुलीचा विवाह सुरू असतानाच वधूपित्याला लुटले! विवाहाच्या आनंदात विरजण

पंचवीस कोटींचा प्रस्ताव 

सप्तशृंगगडाला तीर्थक्षेत्र ‘ब’ दर्जांतर्गत २५ कोटींचा नियोजित प्रस्ताव सादर केला आहे, तसेच जिल्हा नियोजन समितीकडेही हा नियोजित प्रस्ताव सादर केला आहे. ज्या योजनेतून लवकरात लवकर मंजुरी मिळेल त्यातून धरणाचे काम मार्गी लावण्यात येणार आहे. 

ग्रामपंचायत भाविक व देवस्थान यांच्यासाठी नडगीनाला परिसरात नवीन धरण प्रस्तावित केले आहे. त्यास मंजुरी मिळाल्यास सप्तशृंगगडावरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. 
-राजेश गवळी, उपसरपंच, सप्तशृंगगड