सप्तशृंगगडावर भाविकांची मांदियाळी; भगवतीच्या दर्शनासाठी मकरसंक्रांतीचा साधला मुहूर्त 

वणी (जि. नाशिक) : आद्य स्वयंभू शक्तीपीठ सप्तशृंगीगडावर मकरसंक्रांतीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी होती. आदिमायेच्या मंदिरात आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती. सकाळी साडेसहाला भगवतीच्या आभूषणांची श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट कार्यालयात पूजा करण्यात येवून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर आभूषणे न्यासाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मंदिरात नेली. 

सप्तशृंगी गडावर भाविकांची गर्दी

आदिमायेच्या पंचामृत महाअभिषेकादरम्यान मूर्तीस गरम पाण्यात तीळ, पंचामृत टाकून अभ्यंगस्नान घालण्यात आले. यावेळी पंचामृत महापुजेनंतर आदिमायेस जांभळ्या रंगाचे भरजरी महावस्त्र नेसवून सोन्याचा मुकुट, सोन्याचा कुयरी हार, पुतळी गाठले, मणी मंगळसुत्र, कंबरपट्टा, कर्णफुले, नथ, तोडे, पाउले आदीसंह आकर्षक फुलांच्या हाराबरोबरच हलव्याचे अलंकार घालण्यात आले. यानंतर आदिमायेची पंचामृत महापूजा आरती होवून आदिमायेला गुळ तीळ घालून केलेल्या खास पूरणपोळीचा नैवद्य दाखविण्यात आला. दरम्यान, बुधवार (ता. १४) पासून सप्तशृंगी गडावर भाविकांची धनुर्मासाची समाप्ती व भोगीनिमित्त दर्शनासाठी मोठी गर्दी होती. ती संक्रांतीनिमित्त कायम होती. साकुरी शिव (शिर्डी) येथील शिवशक्ती मंडळाच्या शिर्डी ते सप्तशृंगीगड या साईबाबांच्या पालखीचे गडावर साईराम व आदिमायेच्या जयघोषात आगमन झाले. 

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात