सप्तशृंगी गडावरील सुरक्षारकाच्या खुनाचा उलगडा ; आरोपी गजाआड

सप्तशृंगगड : पुढारी वुत्तसेवा :

सप्तशृंगी गडावरील सुरक्षा रक्षकाच्या खून प्रकरणी मयताच्या साडूच्या भावालाच अटक करण्यात आली असून मयताच्या पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे प्रथम दर्शनी तपासात उघड झाले. न्यायालयाने आरोपीस तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सप्तशृंगी गडावर स्थानिक असलेल्या मयत अर्जुन पवार हा काही वर्षांपासून सासरवाडी भेंडी (कळवण) येथे राहत होता. तसेच सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट येथे सुरक्षारक्षक पदावर कार्यरत होता. तो भेंडी ते सप्तशृंगी गडावर दुचाकी वाहनावर ये – जा करत असे. मात्र मंगळवारी १२ जुलै रोजी सप्तशृंगी गडावर रात्री ९ वाजेच्या सुमारास देवस्थान संस्थेत कर्तव्यावर जात असतांना संशयित आरोपी रामदास पवार याने गडावर सुरु असलेला पाऊस व पडलेले धुके याची संधी साधून रात्री ८ वाजून ४० मिनीटांच्या सुमारास सप्तशृंगी गडावरील धबधब्याजवळ मयत अर्जुन पवार याच्यावर कुऱ्हाडीने वार करून पळ काढला.

मात्र सप्तशृंगी गडावर दर्शनाला येणाऱ्या भाविक भक्तांनी पोलीस स्थानक घाटत जखमी अवस्थेत पडलेल्या युवकाबद्दल माहिती दिली. तसेच नांदुरी पोलिसांनी मृत्यू झालेल्या युवकाची ओळख पटवून दिली. मृतदेहाच्या शवविच्छेदनसाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. यासंदर्भात वैद्यकीय अहवाल आल्यावर धारधार शस्त्राने वार केल्याचे समजले. कळवण पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्यासह टीमने अधिक तपास केला असता खुनाचा उलगडा करण्यात यश आले. काही तासातच संशयित आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. आरोपी रामदास पवार याने प्रेमात अडथळा आल्याने खून केल्याची कबुली दिली. याप्रकरणी कळवण पोलिसांत खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अपर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे व पोलीस उपअधिक्षक अमोल गायकवाड यांच्या आदेशानुसार कळवण पोलीस निरीक्षक समाधान नागरे, कळवण पोलीस उपनिरीक्षक महेश निकम, कळवण पोलीस उपनिरीक्षक बबन पाटोळे आदींचे पथक पुढील तपास करत आहे.

म्हणून केली हत्या….
मयत अर्जुन पवार रा. सप्तशृंगी गड तसेच भेंडी ता. कळवण येथील आशा यांचा विवाह दि. ७/६/२०१४ साली सप्तशृंगी गडावर झाला होता. मयताची पत्नी आशाचे तिच्या मोठ्या बहिणीचा दिर रामदास याच्याबरोबर लग्नाधीपासून प्रेम संबंध असल्याचे उघड झाले असून प्रेमात अडथळा ठरत असल्याने त्याचा राग मनात धरून निर्घृण हत्या केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले.

हेही वाचा :

The post सप्तशृंगी गडावरील सुरक्षारकाच्या खुनाचा उलगडा ; आरोपी गजाआड appeared first on पुढारी.