सप्तशृंगी गडावर शुकशुकाट ; दीड महिना मंदिर बंद राहणार असल्याने ग्रामस्थांसह व्यापारी चिंतेत

सप्तशृंगीगडावर शुकशुकाट,www.pudhari.news

सप्तशृंगगड : (जि. नाशिक) पुढारी वुत्तसेवा

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगड येथील भगवतीचे मंदिर मूर्तिसंवर्धन कामासाठी तसेच गाभार्‍यातील विविध कामांसाठी 21 जुलै ते 5 सप्टेंबर या दीड महिन्याच्या कालावधीत दर्शनासाठी पूर्णत: बंद ठेवण्यात आले आहे. काम सुरु होऊन दोन दिवस झाले असून आज तिसरा दिवस आहे. दरम्यान गडावर सर्वत्र शुकशुकाट दिसून येतो आहे.

या ठिकाणी सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह देशभरातून भाविक येत असतात. मोठी वर्दळ याठिकाणी असते. मात्र याठिकाणी दर्शनासाठी बंदी घालण्यात आल्याने पूर्णंता शुकशुकाट पाहावयास मिळतो आहे. भाविकांच्या दर्शनासाठी प्रवेशद्वाराजवळ देवीची मूर्ती ठेवण्यात आली आहे. मात्र मंदिर बंद असल्याचा सर्वांधिक फटका येथील व्यापारी वर्गाला बसणार आहे. दीड महिना मंदिर बंद राहिल्यास आमच्यावर उपासमारीची वेळ येईल असे येथील व्यापा-यांचे म्हणणे आहे. त्यामुळे लवकरात लवकर काम पूर्ण होऊन मंदिर सुरु होण्याची त्यांना प्रतीक्षा आहे.

यापूर्वीही दोन वर्ष कोरोना काळात मंदिर बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले होते.  त्यानुसार मंदिर बंद ठेवण्यात आले होते. त्याचा खूप मोठा फटका येथील ग्रामस्थांना व व्यापारी वर्गाला बसला होता. आता कुठे सर्वांचीच आर्थिक घढी सुरळीत होत होती त्यात आता मंदिर पुन्हा दीड महिना बंद राहणार असल्याने व्यापारी चिंतेत आहे.

उत्पन्नाचे दुसरे साधन नाही 

सप्तशृंगगडावर उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. गडावर येण्यासाठी दहा किलोमीटरचा घाट पार करून यावे लागते. चारहीबाजुंनी जंगल असल्याने या ठिकाणी पर्यायी मार्ग नाही, त्यात मंदिर दीड महिना बंद राहिल्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागणार असल्याने गडावरील ग्रामस्थ व व्यापारी चिंतेत आहे. त्यामुळे मंदिर लवकरात लवकर दर्शनासाठी खुले व्हावे यासाठी ते प्रतीक्षेत आहेत.

सप्तशृंगगड हे पवित्र तिर्थक्षेत्र असून याठिकाणी कायमच भाविकभक्तांची मोठी वर्दळ असते.  मात्र, गेल्या दोनदिवसांपासून मंदिरातील मूर्ती संवर्धनाचे काम सुरु झाल्याने मंदिर बंद आहे. परिणाम गडावर शुकशुकाट आहे. तब्बल दीड महिना मंदिर बंद राहणार असल्याने मोठी चिंता लागून आहे. आम्हा व्यापारी वर्गावर याचा मोठा परिणाम होईल. दीड महिना मंदिर बंद राहिल्यास उपासमारीची वेळही येईल
– निवुत्ती बागुल, व्यापारी सप्तशृंगगड

हेही वाचा :

The post सप्तशृंगी गडावर शुकशुकाट ; दीड महिना मंदिर बंद राहणार असल्याने ग्रामस्थांसह व्यापारी चिंतेत appeared first on पुढारी.