सप्तशृंगी मंदिर भाविकांसाठी दीड महिना बंद राहणार ; ‘हे’ आहे कारण

सप्तशृंगगड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगड येथील भगवतीचे मंदिर मूर्तिसंवर्धन कामाच्या दृष्टीने (चांदीचा लेप) तसेच गाभार्‍यातील विविध कामांसाठी 21 जुलै ते 5 सप्टेंबर 2022 या दीड महिन्याच्या कालावधीत दर्शनासाठी पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा बुधवारी (दि.13) होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सध्या सप्तशृंगगड परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून, दर्शनमार्गावरील पायर्‍यांवर डोंगरावरील पाण्याच्या प्रवाहाने दगड-माती आल्याने भाविक जखमी झाल्याची घटना सोमवारीच घडली होती. मंदिराच्या गाभार्‍यातदेखील पाणीगळती होत आहे. या अनुषंगाने 2012- 2013 पासून विचारधीन असलेल्या मूर्तिसंवर्धनच्या दृष्टीने कामे करण्याचा निर्णय पुरातत्त्व विभाग व मंदिर ट्रस्टच्या वतीने घेण्यात आला असून, त्यासाठी एका खासगी संस्थेला काम देण्यात आले आहे. या संस्थेकडून पुढील दीड महिन्यात मूर्तिसंवर्धनासाठी आवश्यक तसेच गाभार्‍यातील देखभालीची कामे पूर्ण केली जाणार असल्याने या काळात मंदिर भाविकांना दर्शनासाठी पूर्णत: बंद ठेवले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गडाच्या पहिल्या पायरीवर दर्शन

या दीड महिन्याच्या काळात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांसाठी मंदिर ट्रस्टतर्फे गडावरील पहिल्या पायरीजवळ देवीची मूर्ती ठेवली जाणार आहे. तसेच भाविकांना प्रसादालय, भक्त निवास आदी सुविधा उपलब्ध राहणार आहेत.

हेही वाचा :

The post सप्तशृंगी मंदिर भाविकांसाठी दीड महिना बंद राहणार ; 'हे' आहे कारण appeared first on पुढारी.