सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी नांदुरीत घ्यावा लागणार दर्शन पास

वणी (नाशिक) : सप्तश्रृंगी गडावर आदिमायेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची दर्शन व्यवस्था सुरळीत व गर्दी विरहीत होण्यासाठी सप्तशृंगी निवासिनी देवी विश्वस्त संस्थे मार्फत आज सोमवार, ता. २३ नोव्हेंबर पासून नांदुरी घाट रस्त्या दरम्यान असलेल्या कमानी जवळील बंद पडलेल्या टोल प्लाझा येथे प्रत्येक दर्शनार्थी भाविकांना श्री भगवती दर्शनपास सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. 

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

दर्शन पास घेणे बंधनकारक

कोरोनाच्या पाश्‌र्वभूमीवर खबरदारीसह भाविकांची श्री भगवती दर्शन संदर्भीय नियंत्रित व सुरक्षित प्रक्रिया विश्वस्त संस्थेतर्फे कार्यान्वित केले असून निर्धारीत केलेल्या नियोजनाप्रमाणे प्रति ताशी ३६० (पायी मार्गे २४० व रोपवे मार्गे १२०) प्रमाणे रोज ५ हजार ७५० भाविकांची दर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. योग्य नियाजनामुळे सात दिवसात ४६ हजार ८७६ भाविकांनी दर्शन सुरक्षितपणे घेतले. दर्शन पास हा पायी मार्गे व रोप वे माध्यमातून मंदिरात जाणाऱ्या भाविकांना प्राप्त करून घेणे बंधनकारक आहे. फक्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या माध्यमातून गडावर येणाऱ्या भाविकांसाठी विश्वस्त संस्थेचे रोपवे कार्यालय व पहिली पायरी येथील देणगी कार्यालयात सदर दर्शन पास उपलब्ध करून दिला जाणार आहे. मात्र त्यासाठी भाविकाला प्रवास मार्गाचे तिकीट सादर करणे आवश्यक आहे. 
 

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ

नांदुरी येथे निर्धारीत केलेल्या ठिकाणी श्री भगवती दर्शन पास संदर्भीय नोंदणी व त्या अनुषंगिक पूर्तता करणाऱ्या कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. दर्शन पास प्राप्त करूनच श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथे येण्याचे करावे. पहाटे पाच ते रात्री ९ वाजेचे दरम्यान आपल्या वेळेचे नियोजन करून भगवतीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा. 
- सुदर्शन दहातोंडे व्यवस्थापक, श्री सप्तशृंगी देवी ट्रस्ट