सभापतींच्या दौऱ्यात बिटकोच्या समस्यांची पोलखोल! वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी धारेवर

नाशिक रोड : नाशिक रोडच्या प्रभाग सभापती जयश्री खर्जुल, नगरसेवक सूर्यकांत लवटे यांनी मंगळवारी (ता. २४) सायंकाळी महापालिकेच्या नाशिक रोडच्या जुन्या बिटको रुग्णालयाची अचानक पाहणी करीत असुविधांबाबत वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा काळे यांच्या कक्षात धरणे धरले. 

काही डॉक्टर, कर्मचारी गैरहजर असल्याचे निदर्शनास

मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा काळे यांच्या कक्षात सभापती गेल्यानंतर त्या कार्यालयात नसल्याने सभापतींनी तेथेच धरणे धरली. नगरसेवक सूर्यकांत लवटे, योगेश देशमुख, नितीन खर्जुल, किरण डहाळे, विकास गिते, अंकुश बोचरे, गणेश बनकर, विक्रांत थोरात, दीपक खरे, सुमित बनकर, शेखर पवार, भूषण ताजनपुरे आदी उपस्थित होते. बिटको रुग्णालयात डॉक्टरांच्या बाह्य रुग्णांच्या तपासणीची वेळ सकाळी नऊ ते दुपारी एक आणि दुपारी चार ते सहा असताना अनेकदा डॉक्टर अनुपस्थित असल्याच्या तक्रारी सभापती खर्जुल यांच्याकडे आल्याने त्याची खातरजमा करण्यासाठी त्यांनी बिटको रुग्णालयात भेट दिली. त्या वेळी अनेक डॉक्टर, कर्मचारी गैरहजर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याचे खर्जुल यांनी सांगितले. 

वेळ देण्याची मागणी 

सभापतींनी रुग्णांशी संवाद साधला असता, रुग्णालयात नियमित स्वच्छतेसह अनेक तक्रारी मांडल्या. नगरसेवक लवटे यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा काळे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून बाह्यरुग्ण विभागातील डॉक्टर, कर्मचारी कायम अनुपस्थित असल्याची तक्रार केली. डॉ. काळे बिटको रुग्णालयात उपस्थित झाल्या. त्यानंतर डॉक्टरांच्या सततच्या अनुपस्थितीबाबत त्यांना जाब विचारत प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. त्यावर डॉ. काळे यांनी बिटकोतील समस्या दूर करण्यासाठी काही दिवस मला वेळ द्यावा, अशी विनंती केली. 

पाहणीत काय आढळले 

- सायंकाळी ओपीडी, जळीत कक्ष बंद 
- अत्यावश्‍यक कक्षात डॉक्टर, परिचारिका नाहीत 
- एक्स- रे, शस्त्रक्रियेला खासगी रुग्णालयाची शिफारस 
- अनेक डॉक्टर लवकर निघून जातात. 
- अपुरे मनुष्यबळ, अपुऱ्या सुविधांच्या तक्रारी 

हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली

आठ दिवसांत ओपीडी सायंकाळीही सुरू करा, रुग्णांना चांगली वागणूक देत कक्ष नियमित सुरू ठेवण्याची मागणी केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काही दिवस वेळ मागितला आहे. - जयश्री खर्जुल (सभापती, नाशिक रोड प्रभाग)  

हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार