समृद्धी पाठोपाठ बुलेट ट्रेनचेही संकट; इगतपुरी तालुक्यातील शेतक-यांचा सर्वेक्षणाला विरोध

इगतपुरी (जि.नाशिक) : तालुक्यात समृद्धी महामार्गाच्या  कामासाठी शासनाने मोठया प्रमाणात जमिनी संपादित करून शेतकऱ्यांना भूमिहीन केले. अद्यापही शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत असताना आता शेतकऱ्यांपुढे पुन्हा एकदा दुसऱ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

समृद्धी महामार्गालगतच बुलेट ट्रेनचे सर्वेक्षण

समृद्धी महामार्गाजवळूनच आता मुंबई - नागपूर बुलेट ट्रेनसाठीच्या हालचाली गतिमान झाल्याने शेतकरी पुन्हा संभ्रमात पडला आहे. समृद्धी महामार्गाला जवळूनच बुलेट ट्रेन नेण्याचा विचार असल्याने पुन्हा भूसंपादन होण्याची शक्यता आहे त्यामुळे समृद्धी महामार्गापाठोपाठ आता बुलेट ट्रेनचेही संकट इगतपुरी तालुक्याच्या माथी असल्याने महामार्गालगतच्या शेतक-यांवर संकट उभे राहिले आहे.

शेतक-यांचा सर्वेक्षणाला विरोध 

मुंबई- नागपुर दरम्यान बुलेट ट्रेन सुरु करण्याचा शासनाचा मानस असल्याने त्या दृष्टीने शासनाने पाऊले उचलली आहेत आधीच शासनाने समृद्धी महामार्गाला मोठ्या प्रमाणात भूसंपादन करून इगतपुरी तालुक्यालाच भूमिहीन केले समृद्धीचे काम पूर्ण होत नाही तोच आता प्रस्तावित बुलेट मार्गाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रस्तावित नागपूर मुंबई दरम्यानचा मार्ग समृद्धी महामार्गाला लागून जाणार असल्याची वार्ता आहे.

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

अनेक प्रश्न अद्यापही रखडलेलेच

दरम्यान गेल्या दोन दिवसांपूर्वी प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गाबाबत सर्वेक्षणालाही सुरुवात झाली असून इगतपुरी तालुक्यातील औचितवाडी परिसरात बुलेट ट्रेन मार्गाचे सर्वेक्षण झाले.हे सर्वेक्षण समृद्धी महामार्गाला लागूनच झाल्याने स्थानिक शेतकरी पुन्हा चिंतातुर झाले आहेत. बुलेट ट्रेन मार्गाच्या सर्वेक्षणाबाबत स्थानिक शेतकरी बांधवांना हीं माहिती समजताच त्यांनी सर्वेक्षणस्थळी धाव घेऊन होत असलेले सर्वेक्षणाचे काम बंद पाडले असुन समृद्धीबाधित शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न अद्यापही रखडलेले आहेत त्यामुळे शेतकरी नाराज असतानाच आता समृध्दीलगतच्या शेतकऱ्यांवरही आता भूमिहीन होण्याचे संकट निर्माण झाले आहे.

बुलेट मार्गाच्या प्रश्नावरही चर्चा होण्याची शक्यता

दरम्यान येत्या दोन चार दिवसात समृध्दीबाधित शेतक-यांसंमवेत चर्चा करण्यासाठी व शेतकऱ्यांची रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी तसेच समृद्धी महामार्गाच्या कांमाची पाहणी करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाचे राज्यमंत्री इगतपुरी तालुक्याच्या दौऱ्यावर येत असल्याने अधिकारी व शेतकऱ्यांमध्ये चर्चा होणार आहे या बैठकीतच प्रस्तावित बुलेट मार्गाच्या प्रश्नावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीत बुलेट रेल्वे मार्गाबाबत काय माहिती मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

आजपर्यंत असे झाले आहे तालुक्यात जमिनींचे संपादन

वनविभाग 22 हजार हेक्टर, लष्कर विभाग 12 हजार हेक्टर विविध प्रकल्प व धरणांसाठी 11 हजार हेक्टर राष्ट्रीय महामार्गासाठी 3 हजार हेक्टर,रेल्वेसाठी 250 हेक्टर, याव्यतिरिक्त मुंबई- मनमाड पेट्रोल पाइपलाइन,औद्योगीकरण,सिन्नर घोटी महामार्ग ,विज प्रकल्प,पवनचक्की,शासकीय इमारती इत्यादी कामांसाठी हजारो हेक्टर जमीनी संपादित केल्या आहेत.