समृद्धी महामार्गाच्या कामगारांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर; कामगारांनी पुकारले ‘कामबंद आंदोलन’

सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर तालुक्यात सुरू असलेल्या मुंबई -नागपुर समृद्धी महामार्गाच्या कामगारांनी आज (ता.9) सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. पॅकेज 12 अंतर्गत दिलीप बिल्डकॉन या कंपनीने गेल्या तीन महिन्यांपासून कामगारांचे वेतन अदा न केल्याने संतप्त कामगारांनी हे आंदोलन पुकारले आहे. 

तीन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याने कामगारांचे काम बंद आंदोलन

कंपनीच्या गोंदे व वावी येथील कॅम्पच्या प्रवेशद्वारावर एकत्र जमत कामगारांनी कंपनी व्यवस्थापनाचा निषेध नोंदवला. गेल्या तीन महिन्यापासून आमचे पगार होत नसल्याने आमच्या कुटुंबीयांच्या निर्वाहचा प्रश्न गंभीर बनला असल्याचे कामगारांनी सांगितले. कंपनी व्यवस्थापनाकडे वारंवार मागणी करूनही पगार द्यायला टाळाटाळ होत आहे.

एकट्या-दुकट्या कामगाराने त्याची अडचण सांगून पगार मागितला तर व्यवस्थापनातील अधिकारी काम सोडून निघून जाण्याची धमकी देतात. अनेकदा कामगारांना मारहाणही केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सकाळपासून सुमारे 2000 कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारले असले तरी व्यवस्थापनाचा एकही अधिकारी समोर न आल्याने कामगारांच्या संतापात भर पडली आहे. 

हेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळबळ

कामगारांच्या व्यथा -
जेवणाचा दर्जा सुमार असून बहुसंख्य कामगार स्वतःच्या हाताने जेवण बनवत आहेत. तरीदेखील पगारात 3 हजार रुपयांची कपात केली जाते.
आरोग्यविषयक सुविधा पुरवल्या जात नाही. मागील अनेक महिन्यांपासून आरोग्य तपासणी करण्यात आली नाही. 
आजारी कामगारांना उपचारासाठी देखील ऍडव्हान्स मिळत नाही. 
स्थानिक सरकारी दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला जातो.
आम्हाला वेळेवर पगार मिळाला तर आमच्या सर्व गरजा भागवू शकू. 
परराज्यातून येऊन रात्रंदिवस काम करताना सुरक्षा राहिली नसल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.

हेही वाचा - नांदगाव हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले! नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश