समृद्धी महामार्गाने घोटी-सिन्नर रस्त्याची दुरावस्था; धुळीने त्रस्त ग्रामस्थांचे खासदार गोडसेंना साकडे

इगतपुरी (नाशिक) : सिन्नर-घोटी महामार्गावरील धामणी गावाजवळ समृद्धी महामार्गाच्या कामाच्या वाहनामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. त्रस्त वाहनचालक आणि धामणी ग्रामस्थांनी खासदार हेमंत गोडसे यांची भेट घेऊन समृद्धीमुळे रस्त्याची झालेली चाळण थांबविण्याची मागणी केली. 

धामणी ग्रामस्थ हवालदिल

मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गाचे या भागात काम सुरू असून, या कामाच्या धुळीने शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली आहेत. धामणीचे सरपंच गौतम भोसले यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांची बैठक होऊन समृद्धी महामार्ग कार्यालयात वारंवार सूचना देऊनही उपयोग होत नसल्याची धामणीच्या शेतकऱ्यांची तक्रार आहे. मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गाच्या कामाची धूळ धामणीतील पिकांवर पडत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. भाजीपाला पिकांना योग्य दर मिळत नसताना महागडी औषधे, फवारणी, तसेच मजूर आदीं खर्च सोसून उत्पादन खर्चही सुटत नसताना धुळीच्या त्रासाने शेतकरी हवालदिल झाला आहे. याप्रकरणी त्रस्त शेतकऱ्यांनी खासदार हेमंत गोडसे यांना निवेदन देत तक्रारी मांडल्या. सरपंच गौतम भोसले, शेतकरी विष्णू भोसले, वसंत भोसले, संदीप भोसले, रामदास भोसले, जगन पगारे, विठोबा भोसले, ज्ञानेश्वर बालके, वसंत भोसले, मुरलीधर भोसले, नारायण भोसले, ईश्वर भोसले आदींसह धामणी येथील शेतकऱ्यांनी सांगितले. 

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ

समृद्धी महामार्गाच्या कामाला आमचा विरोध नसला तरी शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान टाळावे. धूळ उडणार नाही, याची खबरदारी घेऊन कामाचे नियोजन करावे. शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी सुरू आहे. 
- गौतम भोसले, सरपंच, धामणी 

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता