सरकारला सुबुद्धी दे..! बाबा अमरनाथांच्या चरणी पाच किलो कांदे ठेवत नाशिकच्या शेतकऱ्याची प्रार्थना

बाबा अमरनाथांच्या चरणी पाच किलो कांदे,www.pudhari.news

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी काश्मीरमधील बाबा अमरनाथ यात्रा पूर्ण करत पाच किलो कांदा प्रसाद बाबा अमरनाथ यांना अर्पण करत, कांदा आयात-निर्यातीचे योग्य धोरण ठरविण्यास केंद्र व राज्य सरकारला सुबुद्धी दे..! अशी प्रार्थना केली.

नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे हे अमरनाथ यात्रेसाठी सोबत पाच किलो कांदा घेऊन गेले होते. बाबा बर्फानी यांच्या पवित्र गुहेत समोर असलेल्या दानपेटीला स्पर्श करून साठे यांनी तेच कांदे यात्रेकरूंच्या संरक्षणासाठी असलेल्या लष्करी जवानाकडे सुपूर्द केले. वर्षभरापासून कांद्याला भाव नाही. उत्पादन खर्च भरून निघत नाही. शेतकरी कर्जबाजारी होत आहे. शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळावे, यासाठी केंद्र व राज्य सरकारला कांदा आयात-निर्यातीचे योग्य धोरण ठरविण्यासाठी सद्बुद्धी द्यावी, असे साकडे घातले.

सुरक्षारक्षकांनी साठे यांना गुहेत कांदे नेण्यास विरोध केला होता. परंतु साठे यांनी सांगितले की, इतर भाविक त्यांच्या श्रद्धेप्रमाणे प्रसाद ठेवतात. त्यानुसार मीही श्रद्धेनुसार माझ्या शेतात पिकवलेले कांदे प्रसाद म्हणून आणले आहेत. त्यांचे कांदे तपासून त्यांना ते गुहेत नेण्यास परवानगी देण्यात आली. त्यांच्यासमवेत बाजीराव अभंग, दिलीप घायाळ, श्रीकांत मंडलिक, दिलीप निकम, पवन वाकचौरे, संतोष घायाळ, ज्ञानेश्वर देसले, गणेश जेऊघाले हे सहकारी शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post सरकारला सुबुद्धी दे..! बाबा अमरनाथांच्या चरणी पाच किलो कांदे ठेवत नाशिकच्या शेतकऱ्याची प्रार्थना appeared first on पुढारी.