सरकारीत पाच, तर खासगी लॅबमध्ये २८ टक्के पॉझिटिव्ह! अहवालाच्या विसंगतीबाबत पालकमंत्रीच आचंबित 

नाशिक : नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या चिंताजनक पद्धतीने वाढत आहे. लॉकडाउन शिथिल झाले आहे. लोक मास्क वापरत नाही. तसेच सरकारी आणि खासगी लॅबच्या तपासणी अहवालात तफावत आहे.

सरकारी लॅबमध्ये पाच टक्के रुग्ण पॉझिटिव्ह सापडतात, तर खासगी लॅबमध्ये रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण २८ टक्के आहे. दोन्ही लॅबमधील हे प्रमाण विसंगत असून, या दोन्ही लॅबमधील विसंगत प्रमाणाचे कारणांची स्वतंत्र वैद्यकीय समिती नेमून तपासणी करणार आहे, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. 

कोरोना संपलेला नाही 

भुजबळ म्हणाले, की नाशिकला कोरोना रुग्णसंख्येत काही दिवसांपासून पुन्हा वाढ होत आहे. दिवसाला ३०० पॉझिटिव्ह रुग्णापर्यंत हे प्रमाण वाढले आहे. केवळ नाशिकच नव्हे, तर नागपूर, अमरावतीसह सगळीकडे रुग्णसंख्या वाढत आहे. विदेशात अनेक देशांत पुन्हा लॉकडाउन सुरू करावे लागले आहे. राज्यात कोरोना लॉकडाउन शिथिल करण्यात आल्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून रुग्णांची संख्या पुन्हा वाढली आहे. लॉकडाउननंतर मास्क वापराबाबत लोकांमध्ये उदासीनता वाढली आहे. कोरोना संपलेला नाही. लोकांच्या मागणीवरून लॉकडाउन शिथिल केले आहे; पण आता मास्कशिवाय एन्ट्री नाही, हे प्रत्येकाने पाळले पाहिजे. मास्कच्या वापराबाबत कडक राहिले पाहिजे. सरकारी व खासगी लॅबच्या अहवालात विसगंती आहे. ही विसंगती कशामुळे आहे, याची तपासणी करण्याच्या सूचना जिल्हा वैद्यकीय विभागाला दिल्या आहेत. त्यांच्या अहवालानंतरच नेमकी माहिती येईल. 

हेही वाचा - दोन वर्षांपासून बेपत्ता प्रेमीयुगुलाचा दुर्दैवी शेवट! 'व्हॅलेंटाईन डे'पुर्वी झोपडीत आढळले मृतदेह

हर्ड इम्युनिटी नाही 

ते म्हणाले, की राज्यात सगळीकडेच रुग्णसंख्या वाढत आहे. राज्यात हर्ड इम्युनिटी तयार झालेली नाही. असे मुख्यमंत्री सांगत आहे. जर कोरोनाचे रुग्ण वाढले, तर सामान्य नागरिकांवरील बंधने वाढतील. त्यामुळे बंधन पाळण्याबाबत सामान्य नागरिकांनीच काळजी घेतली पाहिजे. जिल्ह्यात १० मार्चपर्यंत ५९ हजार कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे उद्दिष्ट्यानुसार आतापर्यंत ३० हजार लसीकरण होणे अपेक्षित होते. मात्र २९ हजार जणांनीच लस घेतली आहे. अजूनही सात हजार जणांनी लसीकरणाला प्रतिसाद दिलेला नाही. १० मार्चनंतर सामान्य नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरू होईल. 

शिवजयंतीला परवानगी 

येत्या १९ फेब्रुवारीला होणाऱ्या शिवजयंती उत्सवाला शासनाने परवानगी दिली आहे. पण मास्क वापर, सोशल डिस्टन्सिंग सक्तीचे राहील, तसेच कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असली तरी नाशिक जिल्ह्यात शाळा बंद ठेवण्याचा विचार नाही, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी 

नाशिकला जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक झाली. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेतभुजबळ बोलत होते. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलिस आयुक्त दीपक पांडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलिस अधीक्षक सचिन पाटील आदी उपस्थित होते.