सरण थकतेय मरण पाहून! चांदवड तालुक्यात कोरोनाची वर्षपूर्ती; आतापर्यंत ५९ जणांचा बळी 

गणूर (जि.नाशिक) : चांदवड तालुक्यात गेल्या वर्षी ९ एप्रिलला कोरोनाचा शिरकाव झाला. चांदवड टोलनाक्यावर काम करणाऱ्या २८ वर्षीय तरुणाला लागण होऊन कोरोनाची आकडेवारी सुरू झाली, ती आजपावेतो ५९ बळी घेऊनही थांबलेली नाही. मालेगाव येथे १८ दिवसांचे उपचार घेऊन घरी परतलेला तरुण पंधरा दिवस गृहविलगीकरणात होता. त्याच्या संपर्कातील तब्बल २६९ व्यक्तींवर विशेष नजर ठेवत प्रशासनाची कसरत तालुक्यात तीन हजारांवर व्यक्ती कोरोनाबाधित होऊनदेखील सुरूच आहे. 

वर्षभरात आरोग्य, महसूल, पोलिस आदींनी प्रयत्नांची पराकाष्टा करूनही नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे तालुक्याला कोरोनाने घट्ट विळखा दिला आहे. वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आल्याने महिनाभरापासून बेड, व्हेंटिलेटर, इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे अनेक नागरिकांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे. मृत नातेवाइकांची हतबलता अन् व्यवस्थेवरील ताण याचा परिणाम म्हणून अनेकदा नागरिक व प्रशासनात खटके उडत आहेत. 

एका बेडसाठी दहा जण वेटिंगवर 

चांदवड तालुक्यात बेडची कमतरता दिसून येत आहे. ऑक्सिजन असलेल्या बेडची संख्या ३०, तर साध्या बेडची संख्या ५८ असे एकूण ८८ बेड शासकीय रुग्णालयात उपलब्ध आहेत. कोरोनाच्या जास्त प्रसाराला गृहविलगीकरणात असलेले रुग्ण कारणीभूत ठरत असल्याचे समोर येत आहे. पॉझिटिव्ह रिपोर्ट असूनही सार्वजनिक ठिकाणी वावर करणाऱ्यांमुळे तसेच प्रत्येकाला गृहविलगीकरणात ठेवता येईल, अशी प्रशस्त घरांची संख्या कमी असल्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. आजच्या दिवशी सक्रिय रुग्णांची संख्या ९११ आहे. उपलब्ध बेड बघता एका बेडसाठी दहा रुग्ण वेटिंगवर आहेत. 

हेही वाचा - अवघे गाव हळहळले; दोन दिवसांपूर्वीच्या लेकीच्या लग्नाच्या मांडवातूनच निघाली पित्याची अंत्ययात्रा  

तालुक्यात बेड वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे. औषधे, ऑक्सिजनचाही मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. एका दिवसाच्या निर्णयाने परिस्थिती झटक्यात बदलणारी नाही. नागरिकांनी शक्य ती काळजी घेऊन स्वतःची, कुटुंबाची काळजी घ्यावी. 
-डॉ. राहुल आहेर, आमदार 

चांदवड तालुक्यात ४५ वर्षांवरील नागरिकांना उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण सुरू आहे. शुक्रवारपर्यंत एकूण दहा हजार ७४९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करणे अपेक्षित आहे. 
- डॉ. पंकज ठाकरे, तालुका आरोग्याधिकारी 

चांदवड नगर परिषद हद्दीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एक हजाराहून अधिक नागरिक व पाच मोठ्या आस्थापनांकडून दीड लाखावर दंड वसूल केला आहे. एका व्यक्तीवर गुन्हा नोंदविण्यात आला. आजपासून प्रतिबंधित क्षेत्राची नियमावली अधिक कडक करण्यात आली आहे. 
- अभिजित कदम, मुख्याधिकारी, चांदवड नगर परिषद. 

कोरोनाबाधित रुग्ण 
स्त्री - १४८० 
पुरुष - २४४० 
एकूण - ३९२० 
सक्रिय रुग्ण - ९११ 
एकूण मृत - ५९ 
 

हेही वाचा - लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधू-वरांचा हिरमोड! विसंगत आदेशामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'त गोंधळ