सरपंचपद महिला आरक्षणाने अनेकांचा अपेक्षाभंग! सिन्नरला ५८ गावांसाठी महिला कारभारी 

सिन्नर (जि. नाशिक) : ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा उडाल्यानंतर सरपंच पदासाठी देव पाण्यात बुडवून बसलेल्या अनेकांच्या अपेक्षांवर शुक्रवारी (ता. ५) जाहीर झालेल्या महिला आरक्षण सोडतीने पाणी फिरवले. तर काही ठिकाणी प्रबळ दावेदारांचा मार्ग मोकळा झाल्याने त्यांच्या गोटात मात्र आनंदाचे वातावरण दिसून आले. 

सिन्नरमधील ११४ ग्रामपंचायतींसाठी २०२०-२५ वर्षासाठीच्या प्रवर्गनिहाय सरपंचपदाच्या आरक्षणाच्या सोडतीनंतर शुक्रवारी ५० टक्के महिला सरपंच पदाची आरक्षण सोडत तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आले. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने २०१५ ते २०२० दरम्यानच्या पंचवार्षिक आक्षणाचा अभ्यास करून महिला आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. त्यासाठी एकुण ११४ ग्रामपंचायतींपैकी अनुसुचित जाती महिलांसाठी ४, अनुसुचित जमाती महिलांसाठी ७, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी १५ तर, सर्वसाधारण महिलांसाठी ३२ अशा एकुण ५८ गावांना महिलांना सरपंचपदासाठी निश्‍चित करण्यात आले होते. परिविक्षाधीन प्रांताधिकारी पुजा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आरक्षण सोडतीवेळी तहसीलदार राहूल कोताडे, निवासी नायब तहसीलदार दत्ता जाधव, मंडलाधिकारी माणिक गाडे उपस्थित होते. 

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

ज्या गावांना मागील पाच वर्षात महिला आरक्षण नव्हते त्या गावांची महिला आरक्षणासाठी निवड करण्यात आली. त्यात आरक्षित करावयाच्या महिला सरपंचपदांपैकी गावांची संख्या जास्त झाल्यास त्याठिकाणी चिठ्ठी टाकून महिला आरक्षण जाहीर करण्यात आले. पाच वर्षाच्या ऋषीकेश अंकुश जाधव या मुलाच्या हस्ते कॅमेऱ्यासमोर चिठ्ठी काढण्यात आल्याचे प्रांताधिकारी गायकवाड यांनी स्पष्ट केले. 

महिलांसाठी आरक्षित सरपंचपदे 

अनुसूचित जाती : गुळवंच, खोपडी बु।।, पांगरी बु।।, निमगाव-देवपूर. 
अनुसूचित जमाती : पाटपिंप्री, के. पा. नगर, धोंडबार, चिंचोली, हिवरगाव, कोनांबे, मुसळगाव. 

नागरिकांचा मागास प्रवर्ग : बारागाव पिंप्री, वडगाव-सिन्नर, मेंढी, पंचाळे, विंचुरदळवी, पास्ते, पाटोळे, पाथरे बु., वारेगाव, मऱ्हळ बु., कहांडळवाडी, मानोरी, नांदुरशिंगोटे, फर्दापूर, कासारवाडी. 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

सर्वसाधारण : जोगलटेंभी, नायगाव, सोनगीरी, कोमलवाडी, सुळेवाडी, माळेगाव, श्रीरामपूर, शास्त्रीनगर, चोंढी, खडांगळी, किर्तांगळी, जायगाव, कारवाडी, देवपूर, वडगाव-पिंगळा, जामगाव, सरदवाडी, घोरवड, मनेगाव, शिवाजीनगर, दत्तनगर, आडवाडी, चापडगाव, टेंभुरवाडी, सोनेवाडी, चास, मिठसागरे, मिरगाव, सुरेगाव, कणकोरी, निऱ्हाळे (फत्तेपूर), आगासखिंड.