सरपंच निवडीचा वार शुक्रवार अन्‌ तारीख मात्र १५! सायगावला सरपंच निवडणुकीचा चांगलाच घोळ 

येवला (जि.नाशिक) : राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या सायगाव येथील सरपंच निवडणुकीचा चांगलाच घोळ झाला आहे. सदस्यांना दिलेल्या अजेंड्यावर सरपंच निवडीचा वार शुक्रवार टाकलेला असून, तारीख मात्र १५ (सोमवारची) टाकली आहे. निवडणूक घेणाऱ्या यंत्रणेच्या सावळ्या गोंधळाचा आरोप करून दोषींवर कारवाईची मागणी सदस्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 

निवडणूक प्रक्रियेत संभ्रम
महत्त्वाच्या सायगाव येथील सरपंच, उपसरपंचपदाच्या नोटिसीबाबत संभ्रमावस्था असल्याने निवडणूक प्रक्रियेत संभ्रम केलेला दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर कारवाई करून नवीन निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नियुक्ती करून निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे. 

हेही वाचा - दोन वर्षांपासून बेपत्ता प्रेमीयुगुलाचा दुर्दैवी शेवट! 'व्हॅलेंटाईन डे'पुर्वी झोपडीत आढळले मृतदेह

नोटिसीवर खाडाखोड केल्याने कारवाईची मागणी 
ग्रामपंचायत सदस्यांना निवडणूक नोटीस दिली असून, सदर नोटिसीत वार व तारखेत खाडाखोड केली आहे. जावक क्रमांकदेखील टाकण्यात आला नसल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. सदरची नोटीस शुक्रवारी सकाळी दहाला मिळाली असून, वार शुक्रवार व तारीख मात्र १५ असल्याने ही जुळवाजुळव झाली नाही. किंबहुना काही सदस्य तर सरपंच निवडीसाठी कार्यालयातही आले. मात्र, तेथे कोणीच अधिकारी नसल्याने सर्वांना माघारी परतावे लागले. त्यामुळे हा गोंधळ नेमका झालाच कसा, असा सवाल सदस्यांनी या तक्रारीत केला आहे. सदस्या अनिता खैरनार, दीपक खैरनार, रूपाली उशीर, रंजना पठारे, संदीप पुंड, रेखा जानराव, शालन कुळधर आदींच्या या तक्रार अर्जावर सह्या आहेत.  

हेही वाचा -  नाशिकच्या शासकीय रुग्णालयातून दीड वर्षाच्या चिमुरडीला पळविले; घटना CCTV मध्ये.