सरपंच निवडीसाठी सदस्य अज्ञातस्थळी; नावनिश्‍चितिसाठी फिल्डिंग! 

येवला (जि. नाशिक) : नुकत्याच निवडणूक पार पडलेल्या ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडीचा कार्यक्रम तहसीलदार प्रमोद हिले यांनी जाहीर केला आहे. या गावांमध्ये जोरदार बैठका, पळवापळवी, सदस्य अज्ञातस्थळी हलविणे व नाव निश्‍चितीसाठी लॉबिंग सुरू झाली असून, पुन्हा एकदा गावचे राजकारण तापले आहे. 

येवल्यात ६८ ग्रामपंचायतींसाठी सरपंच निवड 

तालुक्यातील सर्व प्रमुख ग्रामपंचायतींची निवडणूक एकाच वेळी पार पडल्याने सरपंच निवडीविषयी उत्सूकता लागली आहे. विशेषत: १५ ते २० गावात सत्ताधाऱ्यांना अगदी काठावर बहुमत मिळाले असल्याने एका मतावर सरपंच ठरणार असून, अशा गावात मोठी उत्सुकता आहे. किंबहुना पाच ते सहा गावांतील सदस्य अज्ञातस्थळी हलवल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय जेथे आरक्षणामुळे एकाच व्यक्तीला संधी मिळणार तेथे शांतता आहे. परंतु, जेथे दोनपेक्षा जास्त इच्छुक आहे, अशा गावांत बैठका व लॉबिंग सुरु असून, नाव निश्‍चितीसाठी इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. 

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी  

शुक्रवारी निवड होणारी गावे.... 

देवळाणे, तळवाडे, बल्हेगाव, आहेरवाडी, खरवंडी, रहाडी, रेंडाळे, अनकुटे, डोंगरगाव, पिंपळखुटे बुद्रुक, पन्हाळसाठे, धामोडे, उंदिरवाडी, नांदूर, अंगणगाव, आडगाव रेपाळ, नगरसूल, विसापूर, साताळी, बाबुळगाव खुर्द, जळगाव नेऊर, आंबेगाव, वाघाळे, मुखेड, अनकाई, देशमाने बुद्रुक, अंदरसूल, कोटमगाव खुर्द, राजापूर, नेऊरगाव, सातारे, एरंडगाव बुद्रुक, मुरमी, मालखेडा, पाटोदा, ठाणगाव, धामणगाव, गुजरखेडे, भाटगाव, सावरगाव येथील सरपंच निवडणूक होणार आहे. 

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट

सोमवारी निवड होणारी गावे... 

अंगुलगाव, भुलेगाव, पारेगाव, नागडे, आडसुरेगाव, मातुलठाण, बोकटे, कोळगाव, खामगाव, भारम, ममदापूर, खिर्डीसाठे, कुसमाडी, निमगाव मढ, गणेशपूर, पिंपळगाव जलाल, कोळम बुद्रुक, धुळगाव, कानडी, सत्यगाव, पिंपरी, पाटोदा, पुरणगाव, पिंपळगाव लेप, सोमठाणदेश, देवठाण, विखरणी, सायगाव, खैरगव्हाण येथील सरपंच निवड होणार आहे.