सर्वपक्षीयांची टोलप्रश्‍नी बंद दाराआड बैठक; टोलनाक्याबाबत निर्णय गुलदस्त्यात 

इगतपुरी शहर (जि. नाशिक) : घोटी टोलनाका प्रशासन व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी (ता. २२) इगतपुरी तहसील कार्यालयात पार पडली. बंद दराआड झालेल्या बैठकीत पत्रकारांना बैठकीपासून दूर ठेवण्यात आले होते. त्यामुळे सर्वपक्षीय नेते व प्रशासन यांच्यात टोलनाक्याबाबत काय निर्णय झाला, हा देखील चर्चेचा विषय आहे. 

पत्रकारांना दरवाजा बंद

इगतपुरी तालुक्यातील स्थानिक नागरिकांना इगतपुरी येथे दिवसात तीन ते चार वेळेस यावे लागते. त्यामुळे तहसील विभागात सर्वसाधारण नागरिकांचा टोल प्रशासनाविरोधात निषेध सुरू होता. आज घोटी टोलप्रश्नी सर्वपक्षीय नेत्यांनी इगतपुरी येथे तहसील कार्यालयात बैठक घेतली. बैठकीत आमदार हिरामण खोसकर यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. मात्र, बंद दराआड झालेल्या बैठकीत स्थानिक पत्रकारांना आत येण्यास दरवाजाच बंद होता. यामुळे तहसील प्रशासन व सर्वपक्षीय नेते यांच्यात काय निर्णय झाला ते अद्याप तरी समजले नाही. या वेळी बाहेर उभे असलेल्या नागरिकांनी देखील आत झालेल्या बैठकीची नाराजी व्यक्त केली. बंद दराआड झालेली चर्चा व त्याबाबतचा तपशील माध्यमांपासून दूर का ठेवण्यात आले, या बैठकीत प्रशासन व लोकप्रतिनिधींना माध्यमांचे वावडे का, असा सवाल सर्वत्र व्यक्त होत आहे. या बैठकीला पत्रकारांना प्रवेश नाकारल्याने पत्रकार संघाच्या वतीने या वेळी निषेध व्यक्त करण्यात आला. 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

तहसील कार्यालयात बैठकीसाठी क्षमतेपेक्षा जास्त नागरिक उपस्थितीत राहिल्याने दरवाजा बंद केला होता. मात्र, पत्रकार मंडळी बाहेर उभी होती याची माहितीच दिली गेली नाही. बैठकीचा सविस्तर आढावा देऊ. 
-परमेश्वर कासुळे, तहसीलदार 

हेही  वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय