सर्वेक्षणासाठी महामेट्रोचे पथक शहरात! विविध भागांत पाहणी; डिझाइनसह प्रकल्प किंमत ठरविणार 

नाशिक : केंद्र सरकारने नाशिक मेट्रो निओसाठी अर्थसंकल्पात तरतूद केल्यानंतर काम कधी सुरू होणार, याबद्दल नाशिककरांची उत्सुकता संपुष्टात आली आहे. मेट्रोचा प्रस्तावित मार्ग, डिझाइन तसेच प्रकल्पाची किंमत निश्‍चित करण्यासाठी तांत्रिक पथकाने शुक्रवारी (ता.१२) शहराच्या विविध भागांत पाहणी केली. एप्रिलमध्ये मेट्रो कामाच्या निविदा काढण्याबरोबरच कामाला तत्काळ सुरवात केली जाणार आहे. 

फेब्रुवारीत केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिक ‘मेट्रो निओ’ला मंजुरी देताना दोन हजार ९२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यानंतर राज्य सरकारने गेल्या आठवड्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना दोन हजार १०० कोटी रुपयांचा राज्य सरकारचा आर्थिक वाटा देण्याची घोषणा केल्यानंतर मेट्रो निओचे काम कधी सुरू होईल, याची उत्सुकता नाशिककरांना लागली होती. दोन दिवसांपूर्वी महामेट्रोचे सरव्यवस्थापक हेमंत सोनवणे यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याशी प्राथमिक चर्चा केली. शुक्रवारी नागपूर शहरात मेट्रोचे काम करणारे तांत्रिक पथक शहरात दाखल झाले. पालिकेत झालेल्या बैठकीत राइट्स संस्थेने तयार केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार मेट्रो ज्या मार्गावरून धावणार आहे. त्या मार्गाची पाहणी केली. प्रकल्प पूर्ण करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींची माहिती घेतली. संपूर्ण एलिव्हेटेड मार्गावर पिलर उभारले जाणार असल्याने त्या पिलरची उंची, मार्गात येणारे वीज वितरण कंपनीचे खांब, रस्त्याच्या मधोमध येणाऱ्या ड्रेनेज लाइन आदींची माहिती घेतली. ज्या भागात मेट्रो स्टेशन उभारले जाणार आहे, त्या भागातील भूसंपादनासह महापालिकेतर्फे पुरविल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांची माहिती जाणून घेतली. मेट्रो प्रकल्पासाठी महापालिकेकडून सहकार्य करण्याचे आश्‍वासन शहर अभियंता संजय घुगे यांनी दिले. 

एप्रिलमध्ये निविदा, मेमध्ये प्रारंभ 

एप्रिलमध्ये मेट्रोच्या निविदा काढल्या जाणार असून, त्यानंतर महिनाभरात म्हणजे मेमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे. याचदरम्यान मायको सर्कल उड्डाणपुलाचे काम हाती घेतले जाणार असल्याने तीन वर्षे काम सुरू राहील. या भागातून मेट्रोचेदेखील काम सुरू राहणार असल्याने तात्पुरत्या स्वरुपात उड्डाणपुलाचे काम बंद ठेवले जाणार आहे. 

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

असा असेल मेट्रोचा मार्ग 

मेट्रो निओसाठी दोन एलिव्हेटेड कॉरिडोर उभारले जाणार आहेत. पहिला एलिव्हेटेड कॉरिडोर दहा किलोमीटरचा असून, त्यात गंगापूर, जलालपूर, गणपतनगर, काळेनगर, जेहान सर्कल, थत्तेनगर, शिवाजीनगर, पंचवटी, सीबीएस, मुंबई नाका अशी दहा स्थानके असतील. दुसरा कॉरिडोर गंगापूर ते नाशिक रोड असा २२ किलोमीटरचा असून, त्यात गंगापूरगाव, शिवाजीनगर, श्रमिकनगर, एमआयडीसी, मायको सर्कल, सीबीएस, सारडा कॉर्नर, द्वारका, गांधीनगर, नेहरूनगर, दत्त मंदिर, नाशिक रोड अशी स्थानके असतील. सीबीएस कॉमन स्टेशन असून, या टायरबेस मेट्रोसाठी एकूण २९ स्टेशन असणार आहे. याशिवाय दोन फिडर कॉरिडोर असतील. त्यापैकी एक सातपूर कॉलनी, गरवारे, मुंबई नाकादरम्यान चालेल, तर दुसरा नाशिक रोड, नांदूर नाका, शिवाजीनगरदरम्यान चालेल. 

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO 

मेट्रो निओ प्रकल्पात महत्त्वाचे 

- २५ मीटर लांबीच्या २५० प्रवासी क्षमतेच्या जोड बस. 
्- दोन एलिव्हेटेड कॉरिडोर व दोन फीडर कॉरिडोर उभारणार 
- एकूण ३१.४० किलोमीटर लांबीचे एलिव्हेटर 
- गंगापूर ते नाशिक रेल्वेस्थानक २२ किलोमीटरचा पहिला कॉरिडोर 
- पहिल्या कॉरिडोरवर १९ स्टेशन 
- गंगापूर ते मुंबई नाका दहा किलोमीटरचा दुसरा कॉरिडोर 
- द्वारका क्रॉसिंगवरील उड्डाणपुलावर आणखी एक उड्डाणपूल