सलून, ब्यूटिपार्लर रविवारी सुरू ठेवा! जिल्हाधिकाऱ्यांना साकडे 

पंचवटी (नाशिक) : जिल्हा प्रशासनाने शनिवार व रविवार लॉकडाउनचा निर्णय घेतला, परंतु नाभिक समाजाचा व्यवसाय अन्य दिवसांच्या तुलनेत फक्त रविवारी जास्त असतो. सामाजिक रूढी-परंपरांप्रमाणे इतर दिवसांच्या तुलनेत लोक रविवारी केशकर्तन करण्यास प्राधान्य देतात. मात्र याच दिवशी रविवारी लॉकडाउन जाहीर झाल्याने सलून व ब्यूटिपार्लर व्यावसायिकांचे नुकसान होणार आहे. या दिवशी व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी, यासाठी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना साकडे घालण्यात आले. 

आर्थिक नुकसानीचा सामना सलून व्यावसायिकांना
संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यापूर्वी सहा-सात महिन्यांपर्यंत सलून बंद राहिल्याने कारागिरांची आर्थिक स्थिती कमकुवत झाल्याकडे लक्ष वेधले. आता पुन्हा सर्वाधिक व्यवसाय होणाऱ्या दिवशीच लॉकडाउन असल्याने पुन्हा एकदा आर्थिक नुकसानीचा सामना सलून व्यावसायिकांना करावा लागणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे. अगोदरच हातावर असलेला नाभिक समाज अधिक अडचणीत येऊ शकतो.

अटी-शर्तींसह रविवारी सलून व पार्लर सुरू ठेवण्यास परवानगी द्या

म्हणून सर्व अटी-शर्तींसह रविवारी सलून व पार्लर व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, आम्ही याची खात्री देतो, की सलूनमध्ये कोणत्याही प्रकारची गर्दी न होऊ देता आम्ही सुरक्षिततेचे नियम पाळून व्यवसाय करू, आपण सलून व्यावसयिकांच्या अडचणी लक्षात घेऊन रविवारी सलून व पार्लर सुरू ठेवण्यासाठी परवानगी द्यावी, असे निवेदन जिल्हाधिकारी मांढरे यांना महाराष्ट्र नाभिक महामंडळ, नाभिक युवा सेना व नाशिक जिल्हा सलून चालक-मालक संघटनेतर्फे देण्यात आले. या वेळी नारायणराव यादव, अशोक सूर्यवंशी, संगीता मगर, अरुण सैंदाणे, गणेश जाधव, राजेंद्र कोरडे, ज्ञानेश्‍वर बोराडे आदी उपस्थित होते.