नाशिक : अवघ्या तीन वर्षे चार महिन्यांच्या विशांश पवन माळवे या चिमुकल्याने चक्क कळसूबाई शिखर सर करताना विक्रम नोंदविला आहे. वडिलांची गड-किल्ल्यांवरील छायाचित्रे पाहत चिमुकल्या शिवांशलाही लहान वयात आकर्षण निर्माण झाली होती.
चिमुकल्या शिवांशलाही लहान वयात गड-किल्ल्याचे आकर्षण
शिवांशचे वडील पवन माळवे आठ-दहा वर्षांपासून दुर्ग संवर्धनाचे काम करतात. त्यातच शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, सह्याद्री प्रतिष्ठान, गिरिदुर्ग भ्रमंती, राजमुद्रा सोशल फाउंडेशन, दुर्गसेवक प्रतिष्ठान अशा विविध संस्थांच्या माध्यमातून ते काम करत असतात. वडिलांची गड-किल्ल्यांवरील छायाचित्रे पाहत चिमुकल्या शिवांशलाही लहान वयात आकर्षण निर्माण झाले. त्याची आवड लक्षात घेताना त्यालाही गिर्यारोहण मोहिमेत सहभागी करुन घेण्याचे निश्चित झाले. त्यानुसार त्याची तयारी करून घेण्यास सुरवात केली. सुरवातीला चारशे मीटर चालणे, नंतर हळूहळू पळण्याचा सराव करून घेतला. आठ-दहा महिन्यांच्या सरावानंतर माळवे दांपत्य शिवांशला रामशेज किल्ला सर करण्यासाठी घेऊन गेले. यानंतर शिवजयंतीनिमित्त थेट कळसूबाई शिखर सर केले.
हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ
दोन तास ५७ मिमिट ४३ सेकंदांत
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (ता.१९) शिवांश, त्याचे वडील पवन माळवे, आई कोमल पाळवे यांच्यासह चमूने दोन तास ५७ मिमिट ४३ सेकंदांत कळसूबाईचे शिखर गाठले. याची नोंद ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेताना प्रमाणपत्र दिले आहे. शिवांशसोबत या मोहिमेत त्याच्या आई-वडिलांसह सागर विसे, दुर्गसेवक प्रतिष्ठानचे गौरव ढोकळे, प्रतीक्षा पवार, भरत ब्राह्मणे, सुरेश गोलाईत, अंजली प्रधान यांनी सहभाग नोंदवत शिखर सर केले. तर विक्रम नोंदविण्यासाठी त्यांना डॉ. राजेंद्र खरात, संदीप तांबे, दिनेश चव्हाण, डॉ. जी. बी. शाह यांचे सहकार्य लाभले.
हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले
शिखरावर फडकविला तिरंगा
शिवांश व त्याच्या चमूने कळसूबाई सर करताना शिखरावर भगव्या झेंड्यासह भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा फडकविला. या वेळी सर्वच सदस्यांमध्ये उत्साह संचारला होता. वंडर बुक ऑफ रेकॉर्डकरिता नोंदणी झाली असून, ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे श्री. माळवे यांनी नमूद केले.